मुख्यमंत्र्यांकडून मराठा समाजाची दिशाभूल : विनायक मेटे यांचा आरोप - CM misleads Maratha community: Vinayak Mete's allegation | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

मुख्यमंत्र्यांकडून मराठा समाजाची दिशाभूल : विनायक मेटे यांचा आरोप

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 12 जून 2021

बीडमधील मोर्चाने आंदोलनाला सुरवात केली आहे. पाच कायदेपंडितांची समिती स्थापन केली जाईल. ही समिती एक महिन्यात अभ्यास करून सल्ले देईल. त्यानुसार आरक्षण मिळण्यासाठी आगामी काळात वाटचाल असेल.

नगर : ‘‘मराठा (Maratha) समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकार नकारात्मक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी गेले त्यावेळी जीएसटी, मेट्रो रेल्वे, ओबीसी आरक्षण व मराठा आरक्षण असे १४ ते १५ मुद्दे होते. पंतप्रधानांना भेटल्यावर सकारात्मक चर्चा झाली, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची दिशाभूल केली आहे,’’ असा आरोप शिवसंग्राम पक्षाचे नेते आमदार विनायक मेटे यांनी केला आहे. (CM misleads Maratha community: Vinayak Mete's allegation)

आमदार मेटे यांनी नगरला शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेऊन आगामी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. याप्रसंगी नवनाथ इसरवाडे, सुरेश शेटे, राजेंद्र घाग आदी उपस्थित होते.

मेटे म्हणाले, ‘‘बीडमधील मोर्चाने आंदोलनाला सुरवात केली आहे. पाच कायदेपंडितांची समिती स्थापन केली जाईल. ही समिती एक महिन्यात अभ्यास करून सल्ले देईल. त्यानुसार आरक्षण मिळण्यासाठी आगामी काळात वाटचाल असेल. राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन सात जुलैला सुरू होणार आहे. तत्पूर्वी पाच जुलैला राज्य शासनाने आरक्षणाबाबत भूमिका घ्यावी, अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही.’’

‘‘आता मूकमोर्चे राहणार नाहीत; सरकारला जाब विचारणारे मोर्चे काढले जाणार आहेत. महसूल विभागीय कार्यालयांवर मोर्चे काढले जातील. त्यानंतर मुंबईला मोर्चा काढला जाईल,’’ असे ते म्हणाले.

दरम्यान, समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी विविध संघर्ष मेळावे जिल्हास्तरावर आयोजित केले जाणार आहेत. दहा हजार दुचाकीस्वारांची फेरी २७ जून रोजी मुंबईत आयोजित केली जाणार आहे. समाजाने आता रस्त्यावरील लढाईसाठी तयार राहिले पाहिजे, असे आवाहनही आमदार मेटे यांनी केले.

 

हेही वाचा..

‘कोरोनामुक्त गाव’ अभियानात सहभागी व्हावे

संगमनेर :  राज्याच्या शहरी भागातील कोरोना आटोक्यात येत असला, तरी ग्रामीण भागातील रुग्णवाढ रोखण्यासाठी राज्य सरकारच्या ‘कोरोनामुक्त गाव’ अभियानात सहभागी होऊन, गाव, तालुका, जिल्हा व राज्य कोरोनामुक्त करण्यात योगदान देण्याचे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

थोरात साखर कारखान्यावर आयोजित गावांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत थोरात बोलत होते. ते म्हणाले, ‘‘कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत महाविकास आघाडी सरकारने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत प्रभावी काम केले. त्यांच्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’, ‘मी जबाबदार’ आदी अभियानांतर्गत गावोगावी झालेल्या चाचण्यांमधून रुग्णसंख्या वाढल्याचे दिसले. मात्र, यातून तातडीने उपचार करणे शक्य झाले. लॉकडाउनच्या शिथिलतेनंतर वाढणारी गर्दी अत्यंत चिंताजनक आहे. यातून कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने शासकीय नियमांचे पालन करीत, मास्कचा नियमित वापर, सोशल डिस्टन्सचे पालन करणे गरजेचे आहे.’’

आमदार डॉ. तांबे म्हणाले, ‘‘विस्ताराने मोठ्या असलेल्या संगमनेर तालुक्यातील १७४ गावांपैकी ८१ गावे कोरोनामुक्त झाली असून, ३१ गावे कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहेत.’’ नगराध्यक्ष दुर्गा तांबे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे उपस्थित होते.

 

हेही वाचा..

देशमुखांच्या जागी जगतापांना संधी द्या

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख