महाविकास आघाडीसमोर साईबाबा संस्थानचे नवे मंडळ नियुक्तीचे आव्हान

अध्यक्ष व उपाध्यक्षांसह नियुक्त केलेल्या पंधरा विश्वस्तांवर नैतिक अधःपतनाचे व गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे दाखल नसावेत, असा एक महत्त्वाचा निकष त्यात आहे.
saibaba.jpg
saibaba.jpg

शिर्डी : पात्रतेचे निकष कठीण असल्याने, यापूर्वीच्या दोन राज्य सरकारांना पूर्णवेळ काम करू शकतील अशी मंडळे साईसंस्थानवर (Saibaba Sansthan) नियुक्त करता आली नाहीत. यापूर्वीच्या भाजप-सेना युतीच्या काळातील मंडळाने अवघ्या दीड वर्षात आपले अधिकार गमावले, तर त्यापूर्वीचे कॉँग्रेस- आघाडीचे मंडळ एका दिवसात घरी गेले होते. हे दोन्ही अनुभव लक्षात घेऊन नवे मंडळ नियुक्त करण्याचे आव्हान राज्यातील महाविकास आघाडी सरकारसमोर आहे. (Challenge of appointment of new board of Saibaba Sansthan before Mahavikas Aghadi)

अध्यक्ष व उपाध्यक्षांसह नियुक्त केलेल्या पंधरा विश्वस्तांवर नैतिक अधःपतनाचे व गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे दाखल नसावेत, असा एक महत्त्वाचा निकष त्यात आहे. आता या नैतिक अधःपतनाच्या व्याख्येची व्याप्ती किती मोठी असेल, यावर या निमित्ताने मोठा खल होईल. न जाणो, कदाचित नेहमीप्रमाणे या एकाच मुद्यावर न्यायालयाचे दरवाजेदेखील ठोठावले जातील.

याबाबत माहितीच्या अधिकारातील कार्यकर्ते संजय काळे व संदीप कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, समाजाच्या हिताला बाधा आणणारे कुठलेही कृत्य नैतिक अधःपतनाच्या व्याख्येत येऊ शकते.

नवे मंडळ निवडताना अध्यक्ष व उपाध्यक्ष, तसेच पंधरा विश्वस्तांची निवड करायची आहे. त्यांतील आठ विश्वस्त हे कुठल्या ना कुठल्या क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणजे डॉक्टर, वकील, आर्किटेक्ट आदी असावेत. त्यांना त्यांच्या क्षेत्रातील कामाचा पाच ते दहा वर्षांचा अनुभव हवा. अन्य सात विश्वस्त हे नगर जिल्ह्यातील रहिवासी असावेत. सर्व जण पदवीधर असावेत आणि त्यांचे वय सत्तरपेक्षा अधिक नसावे, असे आणखी काही निकष आहेत.

नवे मंडळ राजकीय असावे की नसावे, हा चर्चेचा मुद्दा असला, तरी त्याचा या निवडीवर काहीही परिणाम होणार नाही. राजकारणातील मंडळींची नियुक्ती करण्यास कुठलीही अडचण नाही. मागील नियुक्तीच्या वेळीही ती नव्हती. मुद्दा एवढाच आहे, ते कुठल्या तरी क्षेत्रातील खरेखुरे जाणकार असावेत. त्यांच्या ज्ञानाचा फायदा साईसंस्थानच्या विकासासाठी व्हावा, अशी संकल्पना त्यामागे आहे. दरम्यान, या निवडीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com