दोन दिवसांच्या माघारीचा खेळ, कोण-कोणाचा घालणार मेळ  - adcc bank latest news, adcc bank updats, two day return game | Politics Marathi News - Sarkarnama

दोन दिवसांच्या माघारीचा खेळ, कोण-कोणाचा घालणार मेळ 

मुरलीधर कराळे
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

पाथर्डी-शेवगावमधून बिनविरोध झालेल्या आमदार मोनिका राजळे या भाजपच्याच आहेत. नव्याने बिनविरोध होणार असलेले राळेभात हेही भाजपचे म्हणजे विखेंचेच कार्यकर्ते आहेत.

नगर : अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या 21 संचालकांच्या निवडीसाठी निवडणूक होऊन अर्ज दाखल झाले. गुरुवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत वेगवान घडामोडी होऊ लागल्या आहेत. बिनविरोध निवडीसाठी नेत्यांनी "हाय कमांड'कडून फिल्डिंग लावली आहे.

काल तीन जणांनी अर्ज माघारी घेऊन दोघांना बिनविरोधचा मार्ग मोकळा केला. येत्या दोन दिवसांत माघारीसाठी इच्छुकांनी संबंधितांचे पाय धरले असले, तरी संबंधित पक्षाच्या हाय कमांडकडून आदेश आल्याशिवाय कुणाचे काही चालत नाही. त्याचे प्रत्यंतर काल आले. 

हेही वाचा... शिवसेनेची टीका अण्णा हजारेंना जिव्हारी

जिल्हा बॅंकेच्या 18 जागांसाठी 188 रिंगणात आहेत. गुरुवारी (ता. 11) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतीम तारीक आहे. 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. यापूर्वी नेवासे व राहाता सेवा संस्थांच्या मतदार संघाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. राहात्यातून अण्णासाहेब म्हस्के तर नेवासे मतदारसंघातून चंद्रशेखर घुले यांच्या विरोधात अर्ज शिल्लक नसल्याने ते बिनविरोध निवडून आले. काल पाथर्डी मतदारसंघातील इच्छुक उमेदवार मथुराबाई संभाजी वाघ यांनी अर्ज मागे घेतल्याने आमदार मोनिका राजळे यांची निवड बिनविरोध झाली. 

जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश महादेव भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे विद्यमान संचालक जगन्नाथ देवराव राळेभात यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. तेथे त्यांचे पूत्र अमोल यांचाही अर्ज असल्याने दोघांपैकी एकजण बिनविरोध होईल. एकूणच नेवासे, राहाता व जामखेड येथील बिनविरोधचा तिढा सुटला आहे. इतर 19 जागांपैकी काही जागा बिनविरोध होण्यासाठी दोनच दिवसांचा आता अवधी शिल्लक आहे. या काळात खलबते होणार आहे. कोपरगाव विविध कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघातून अलकादेवी राजेंद्र जाधव यांनी अर्ज मागे घेतला असला, तरी तेथे इतर चार अर्ज बाकी आहेत. 

हेही वाचा... साईकृपाच्या गाळपाला या नेत्यांची आडकाठी

जामखेडचे राळेभात हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे कट्टर समर्थक तथापि, त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांना विश्‍वासात घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार सुरेश भोसले यांना अर्ज मागे घेण्यास भाग पाडले. साहजिकच तेथे विखे-पवारांची सहमती एक्‍सप्रेस धावली, असेच चित्र निर्माण झाले. त्यामुळे राळेभात पितापुत्रापैकी एकाचा मार्ग मोकळा झाला. 

बिनविरोधमध्ये भाजपचीच चलती 

यापूर्वी बिनविरोध झालेल्या जागांमध्ये राहात्याचे बिनविरोध निवडून आलेले अण्णासाहेब म्हस्के हे विखेंचे कार्यकर्ते आहेत. पाथर्डी-शेवगावमधून बिनविरोध झालेल्या आमदार मोनिका राजळे या भाजपच्याच आहेत. नव्याने बिनविरोध होणार असलेले राळेभात हेही भाजपचे म्हणजे विखेंचेच कार्यकर्ते आहेत. त्यामुळे आतापर्यंत 19 पैकी तीन जागा विखेंच्या गोटात आलेल्या आहेत. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख