सातारच्या मेडिकल कॉलेजला यशवंतरावांचे नाव द्या; जिल्हा परिषदेच्या सभेत ठराव - ZP Demands To gave name of Yashwantrao chavan to Satara Medical college | Politics Marathi News - Sarkarnama

सातारच्या मेडिकल कॉलेजला यशवंतरावांचे नाव द्या; जिल्हा परिषदेच्या सभेत ठराव

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 16 जून 2021

साताऱ्यातील येथील जिल्हा रुग्णालयात नाना पाटील यांचा पुतळा उभारण्यात यावा, असाही ठराव करण्यात आला. या दोन्ही ठरावाला हात उंचावून आणि टाळ्यांचा गजरात पदाधिकाऱ्यांनी मान्यता दिली.

सातारा : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण Yashwantrao Chavan यांनी आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी केली. जिल्ह्याचे सुपुत्र म्हणून देशाला विकासाची दिशा देणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाचे नाव येथे होणाऱ्या शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाला देण्याचा एकमुखी ठराव सातारा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला. दरम्यान, साताऱ्यातील येथील जिल्हा रुग्णालयात नाना पाटील यांचा पुतळा उभारण्यात यावा, असाही ठराव करण्यात आला. या दोन्ही ठरावाला हात उंचावून आणि टाळ्यांचा गजरात पदाधिकाऱ्यांनी मान्यता दिली. ZP Demands To gave name of Yashwantrao chavan to Satara Medical college
 
सातारा जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा उदय कबुले यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सभागृहात झाली. या वेळी उपाध्यक्ष प्रदीप विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सर्व विभागांचे सभापती उपस्थित होते. सर्वसाधारण सभेत कोरोनाचे संकट आणि तिसऱ्या लाटेच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली. जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत कोरोनात केलेले काम, लसीकरण आदी विषयांची आकडेवारी सभागृहात प्रोजेक्टद्वारे देण्यात आली.

हेही वाचा : केंद्र सरकारने मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावं : धैर्यशील माने

ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, ते मिळण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत, अशा मागणीचा ठराव सदस्य दत्ता अनपट यांनी मांडला. जिल्हा परिषदेत बोगस शाखा अभियंते कार्यरत असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सदस्य दीपक पवार यांनी केली. त्यावर जिल्हा परिषदेची फसवणूक करून काम करणाऱ्या बोगस अभियंत्यांची नावे येत्या १५ दिवसांत जाहीर करून त्यांचा अहवाल देण्याचा आदेश अध्यक्ष कबुले व श्री. गौडा यांनी बांधकाम विभागाला दिला. जिल्ह्यात लसीकरणाची संख्या वाढण्यासाठी खासगी रुग्णालयांना जिल्हा परिषदेने प्रोत्साहन देण्याची मागणी सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी केली. 

घरी जाऊन तलंगा शाोधणार.....

पशुसंवर्धन विभागामार्फत वंचित घटकातील लोकांना उदरनिर्वाहासाठी २३ तलंगा व दोन नर कोंबडे हे शंभर टक्के अनुदानावर दिले जातात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून एका जिल्हा परिषद सदस्याने या योजनेत ४० प्रकरणे तयार करून योजनेचा लाभ खिशात घालण्याचा प्रयत्न केला होता. हा विषय समोर आल्याचे दीपक पवार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणत सातारा तालुक्यातील लाभार्थ्यांची यादी पशुसंवर्धन विभागाने तत्काळ द्यावी, अशी मागणी केली. लवकरच तालुक्यात लाभार्थ्यांच्या घरी जाऊन तलंगा व कोंबड्या शोधणार असल्याचे त्यांनी सांगताच सभागृहात एकच हशा पिकला. 

समाजकल्याण विभागावर ताशेरे....

लाभार्थ्यांना लॅपटॉप व कलाकारांचे रखडलेले मानधन आदी विषय मार्गी लावण्यात समाजकल्याण विभागाकडून हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप दत्ता अनपट व अर्चना देशमुख यांनी केला. त्यावर समाजकल्याण अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरावर व त्यांच्या एकूण कारभारावर पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. या विषयावर अध्यक्षांनी समाजकल्याण अधिकाऱ्यांनी कारभारात सुधारणा करावी अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख