केंद्र सरकारने मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावं : धैर्यशील माने - Special session of Lok Sabha should be held says Dhairyashil Mane | Politics Marathi News - Sarkarnama

केंद्र सरकारने मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावं : धैर्यशील माने

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 16 जून 2021

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आजपासून कोल्हापुरातून आंदोलनाची सुरुवात झाली आहे.

कोल्हापूर : राज्यातील कोणत्याही लोकप्रतिनिधीचा मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) विरोध नाही. तरीही आरक्षण का मिळत नाही, हा प्रश्न मराठा बांधवांच्या मनात आहे. 102 व्या घटनादुरूस्तीने राज्यांचे अधिकार कमी झाले आहे. आता राज्यातील सर्व खासदार व आमदारांनी एकत्रित येत राष्ट्रपती व सभापतींकडे मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी करायला हवी. आरक्षणासाठी अधिवेशन झालंच पाहिजे, अशी भूमिका खासदार धैर्यशील माने यांनी मांडली. (Special session of Lok Sabha should be held says Dhairyashil Mane)

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आजपासून कोल्हापुरातून आंदोलनाची सुरुवात झाली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती हे आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. सकाळी अकरा वाजता शाहू महाराजांच्या समाधी स्थळापासून मूक आंदोलनाला सुरवात होईल. या आंदोलनात शाहू महाराज, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, खासदार धैर्यशील माने यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी, राज्यभरातील मराठा आरक्षणाचा समन्वयक आदी उपस्थित आहेत. 

हेही वाचा : राजकारण तापलं; मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र राज्यपालांकडूनच उघड

मुक आंदोलन असल्याने आंदोलनात सहभागी होणाऱ्या लोकप्रतिनिधींना उलटसुलट न बोलण्याचं आवाहन संभाजीराजेंनी केलं आहे. केवळ लोकप्रतिनिधींनाच आपली भूमिका मांडण्यास सांगण्यात आले आहे. यावेळी बोलताना माने म्हणाले, मराठा आरक्षणासाठी दोन टप्प्यांवर लढाई लढावी लागणार आहे. न्यायालयीन लढाईत बाजू योग्यप्रकारे मांडण्यासाठी समिती स्थापन झाली आहे. महाराष्ट्राने मागास आयोगही नेमला आहे. न्यायालयीन लढाई लढत असताना जनरेटाही तयार व्हायला हवा. 

मराठा आरक्षणासाठी राज्यातील 48 खासदार व सर्व आमदारांनी विशेष अधिवेशनाची मागणी करायला हवी. लोकसभेचे विशेष आधिवेशन घेण्याची मागणी राष्ट्रपती व सभापतींना करायला हवी. मराठा समाजासाठी हे अधिवेशन घ्यावेच लागेल, असे माने म्हणाले. संभाजीराजेंनी सर्व लोकप्रतिनिधींना एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं. आज सर्व पक्षाचे नेते उपस्थित आहेत. महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी कोल्हापूरने पाऊल पुढे टाकलं आहे, असेही माने यांनी नमूद केलं.  

खासदार धैर्यशील माने सलाईन लावून आंदोलन ठिकाणी दाखल झाले आहेत. मराठा समाजासाठी कोणत्याही परिस्थितीत असलो तरी उपस्थित राहणार अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. धैर्यशील माने नुकतेच कोरोना निगेटिव्ह झाले आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख