दोन नेते, दोन संपर्क मोहिमा; शिवसेनेत खैरे विरुद्ध दानवे वाद पुन्हा चव्हाट्यावर.. - Two leaders, two contact missions; Danve controversy against Khaire in Shiv Sena is on the rise again .. | Politics Marathi News - Sarkarnama

दोन नेते, दोन संपर्क मोहिमा; शिवसेनेत खैरे विरुद्ध दानवे वाद पुन्हा चव्हाट्यावर..

सरकारनामा ब्युरो
रविवार, 11 जुलै 2021

पक्षाने दिलेला एकच कार्यक्रम हे दोन नेते स्वंतत्ररित्या राबवतांना दिसत आहेत.

औरंगाबाद ः राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात शिवसंपर्क मोहिम राबवण्याचे आदेश सर्व जिल्हाप्रमुख व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना नुकतेच मुंबईतील बैठकीत दिले. आघाडीचा विचार न करता स्वबळासाठी गावागावात संपर्क वाढवा, शिवसेना घराघरात पोहचवा, असे आवाहन देखील त्यांनी केले. (Two leaders, two contact missions; Danve controversy against Khaire in Shiv Sena is on the rise again) एकीकडे स्वबळाचा नारा सुरू असतांना जिल्ह्यात मात्र दोन नेत्यांमधील अंतर्गत गटबाजी मात्र पुन्हा एकदा उफाळून आली आहे.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे या दोघांनी मात्र एकला चलो धोरण अंवलबल्याचे दिसून आले आहे. पक्षाने दिलेला एकच कार्यक्रम हे दोन नेते स्वंतत्ररित्या राबवतांना दिसत आहेत. चंद्रकांत खैरे यांनी १२ ते २४ जुलै दरम्यान जिल्ह्यात शिवसंपर्क मोहिम राबवण्याची घोषणा केली. (Shivsena Leader Chandrakant Khaire) तर दानवे यांनी आजपासून म्हणजेच ११ ते ३१ जुलै दरम्यान ही मोहिम जिल्ह्यात रावण्याची घोषणा करून त्याला सुरूवात केली आहे.

एकाच जिल्ह्यात शिवसेनेच्या दोन संपर्क मोहिमांमुळे पदाधिकार आणि शिवसैनिकांची मात्र गोची झाली आहे. कुणाच्या मोहिमेत सहभागी व्हावे, असा मोठा पेच त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. (Shivsena Mla And District Chief Ambadas Danve) राज्यातील सत्ता, मुख्यमंत्रीपद जिल्ह्याला दोन मंत्रीपद, सात आमदार आणि बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये सत्ता असतांना या दोन नेत्यांमधील वादाचा फटका शिवसेनेला भविष्यात बसू शकतो, अशी चर्चा या निमित्ताने सुरू आहे.

खैरे-दानवे यांच्यातील संघर्ष जिल्ह्याला नवा नाही. अनेकदा हे दोन नेते आमने-सामने आलेले दिसून आले आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर तर या दोघांमधील दरी अधिकच वाढली आहे. एकमेकांच्या कार्यक्रमांना हजेरी न लावणे, टाळणे असे प्रकार दोघांकडून देखील केले जातात. मुंबईतील वरिष्ठ नेता आला तेव्हाच नाइलाजाने हे दोघे एकत्र येतात, असेही पहायला मिळाले.

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येऊन जिल्ह्याचे पालकमंत्री पद सुभाष देसाई यांच्याकडे आल्यापासून तर खैरे यांना डावलून जिल्ह्यातील अनेक महत्वाचे निर्णय घेतले जात असल्याचे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणूकीवरून दिसून आले होते. त्यामुळे नाराज असलेल्या खैरे यांनी स्वंतत्रपणे आपला संपर्क जिल्ह्यात वाढवण्यावर भर दिला आहे. शिवसंपर्क मोहिमेच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्यांनी हेच दाखवून दिले आहे.

कुणाकडे जावे, शिवसैनिक संभ्रमात..

१२ ते १२ जुलै दरम्यान, शिवसंपर्क मोहिज जिल्ह्यात राबवण्याची घोषणा केल्यानंतर खैरे यांनी ६ जुलैपासूनच यासंदर्भातील बैठक शहर आणि ग्रामीण भागात घ्यायला सुरूवात केली होती. जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व शिवसैनिक या मोहिमेत सहभागी देखील झाले. मात्र आता जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी आजपासून ३१ जुलैपर्यंत सुरू केलेल्या शिवसंपर्क मोहिमेमुळे आता खैरे सोबत असलेले पदाधिकारी, शिवसैनिक काय भूमिका घेतात हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाला असला तरी त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी शिवसनेचे सर्व आमदार निवडून देत झालेली चूक सुधारली होती. जिल्ह्यात शिवसेनेला चांगले वातावरण आहे. राज्यातील सत्ता आणि महाविकास आघाडीमुळे देखील शिवसेनेची ताकद वाढली आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका लक्षात घेता शिवसेनेसाठी ही शिवसंपर्क मोहिम महत्वाची मानली जाते. परंतु या मोहिमेला गटबाजीचे ग्रहण लागल्यामुळे याचा फटका पक्षाला बसू शकतो.

इकडे भाजपने जिल्ह्यात आपली ताकद वाढवण्यावर भर दिला  आहे. खासदार डाॅ. भागवत कराड यांना केंद्रीय मंत्रीमंडळात घेत त्यांना थेट अर्थखाते दिल्याने भाजपचा आत्मविश्वास अधिकच वाढला आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषद व इतर स्थानिक स्वराज्य संस्था व २०२४ ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेला शह देण्यासाठीच भाजपने कराड यांना मंत्रीपदाच्या माध्यमातून बळ दिल्याचे बोलले जाते. असे असतांना शिवसेना मात्र अंतर्गत गटबाजीतच अडकून पडल्याचे दिसते आहे.

हे ही वाचा ः पंकजा मुंडे अचानक दिल्लीला, तर्कवितर्कांना उधाण..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख