शिवसेनेचे आमदार म्हणतात, कोरोनाने जीवाभावाचे मित्र हिरावून नेले, वाढदिवस कसा साजरा करू.. - Shiv Sena MLA says, Corona has deprived her lifelong friend, how can we celebrate birthday .. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

शिवसेनेचे आमदार म्हणतात, कोरोनाने जीवाभावाचे मित्र हिरावून नेले, वाढदिवस कसा साजरा करू..

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 29 जून 2021

शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील वारंवार गर्दी टाळण्याचे आवाहन जनतेला करत आहेत. त्यांच्या आदेशाचे शिवसेनेचा एक लोकप्रतिनिधी म्हणून पालन करणे माझे आणि कर्तव्य आहे.

औरंगाबाद ः कन्नडचे शिवसेना आमदार उदयसिंह राजपूत यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना एक आगळेवेगळे आवाहन केले आहे. कोरोनामुळे जाहीरपणे वाढदिवस साजरा न करता जो वेळ पदाधिकारी, कार्यकर्ते माझ्या वाढदिवसासाठी खर्ची घालणार आहेत, तोच वेळ आपल्या आई-वडील, बहिण-भाऊ व आप्तेष्ठांशी संवाद साधण्यासाठी द्यावा, अशी साद उदयसिंह राजपूत यांनी घातली आहे. ( Shivsena Mla Udaysinh Rajput) शिवाय कोरोनाने गेल्या काही महिन्यात जीवाभावाचे मित्र, सहकारी हिरावले गेले, त्यांचे दुःख मनात असतांना वाढदिवस कसा साजरा करू?, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

राजकीय नेते, आमदार, खासदार, एवढेच काय तर साधा नगरसेवक असला तरी त्याचा वाढदिवस जंगी होतो. त्यातच जर एखादा आमदार पहिल्यांदाच निवडून आला असेल तर मग पहायलाच नको. (Kannad-Soygaon Contituency) पण कन्नडचे शिवसेना आमदार याला अपवाद ठरले आहेत.

राजपूत हे पहिल्यांदा कन्नड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. विशेष म्हणजे २० वर्षात त्यांनी तीनवेळा विधानसभेची निवडणूक लढवली, पण २०१९ मध्ये त्यांना यश मिळाले आणि त्यांचे आमदार होण्याचे स्वप्न पुर्ण झाले. त्यामुळे आमदार झाल्यानंतरचा त्यांचा हा दुसरा वाढदिवस.

पण कोरोनामुळे त्यांना तो जाहिरपणे साजरा करता येणार नाहीये. कोरोनाची लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने राजपूत यांनी आज सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

प्रत्येकाचे आयुष्य हे धावपळीचे आणि दगदगीचे झाले आहे. त्यामुळे आपण आपल्या कुटुंबियांना देखील पुरेसा वेळ देऊ शकत नाही, आई-वडील, बहिण-भाऊ, पाहुणे यांची आपल्याबद्दल नेहमीच तक्रार असते. तेव्हा माझ्या वाढदिवसासाठी कार्यक्रमाचे आयोजन, भेटीगाठी यासाठी वेळ खर्च करण्यापेक्षा तोच वेळ आपल्या कुटुंबियांना द्या, तीच माझ्यासाठी वाढदिवसाची भेट असेल. 

कोरोनाने जवळचे लोक हिरावले..

कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही, शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील वारंवार गर्दी टाळण्याचे आवाहन जनतेला करत आहेत. त्यांच्या आदेशाचे शिवसेनेचा एक लोकप्रतिनिधी म्हणून पालन करणे माझे आणि कर्तव्य आहे. शिवाय कोरोनाने गेल्या काही महिन्यात माझ्या जवळचे, जीवाभावाचे मित्र, सहकारी हिरावून नेले.

त्यांचे दुःख मनात असतांना वाढदिवस साजरा कसा करू, असेही राजपूत यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.  कोरोनाचे संकट टळल्यानंतर पुढील वर्षी वाढदिवस नक्की साजरा करू, पण तोही सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून असेही, राजपूत म्हणाले. 

हे ही वाचा ः गणेशोत्सावाबद्दल राज्य सरकारची महत्वपुर्ण घोषणा..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख