राजीनामास्त्रः काहींना निष्ठा दाखवायची अन् पदही वाचवायचे आहे.. - Resignation: Some want to show loyalty and even save the post. | Politics Marathi News - Sarkarnama

राजीनामास्त्रः काहींना निष्ठा दाखवायची अन् पदही वाचवायचे आहे..

सरकारनामा ब्युरो
रविवार, 11 जुलै 2021

खासदार डॉ. प्रितम मुंडे यांना टाळत डॉ. भागवत कराड यांना केंद्रीय मंत्रीमंडळात घेतल्याने मुंडे समर्थक अस्वस्थ आहेत. संघटना पदाधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी राजीनामे देत आहेत.

बीड : खासदार डॉ. प्रितम मुंडे यांना टाळून डॉ. भागवत कराड यांना केंद्रीय मंत्रीमंडळात घेतल्याने नाराज भाजप पदाधिकारी राजीनामे देत आहेत. (Resignation: Some want to show loyalty and even save the post.) संघटनेतील पदाधिकाऱ्यांसह पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य देखील राजीनामे देत आहेत.

मात्र, राजीनामा मंजूर करण्याचा अधिकार असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मात्र अद्याप एकाही पंचायत समिती सदस्य किंवा जिल्हा परिषद सदस्याने राजानामा दिला नाही. (Bjp Leader Pankaja Munde) त्यामुळे मुंडे भगीनींबाबत एकनिष्ठता दाखविताना इकडे पदाची कातडी वाचविण्याची चिंताही या मंडळींना असल्याचे स्पष्ट होत आहे.

चार दिवसांपूर्वी झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात खासदार डॉ. प्रितम मुंडे यांना संधी मिळेल, असा समर्थकांचा पुर्ण विश्वास होता. (Bjp Beed Mp Dr. Pritam Munde) केवळ दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या व भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या भगीनी यापेक्षाही त्या दोन वेळा खासदार आणि उच्चशिक्षीत आहेत. या बळावर त्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळेल, असे समर्थकांना वाटत होते.

मात्र, महानगर पालिकेला पराभूत असलेल्या व राज्यसभेवर खासदार असलेल्या डॉ. भागवत कराडांना मंत्रीमंडळात स्थान मिळाले. त्यामुळे ही बाब मुंडे समर्थकांच्या खुपच जिव्हारी लागली आहे. नाराज नसल्याचे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी सांगीतले असले तरी त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे. त्यातून सुरुवातीला भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी राजीनामा दिला.

त्यानंतर जिल्ह्यातील भाजपच्या सर्वच तालुकाध्यक्षांसह विविध आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे दिले. सर्वांनी आपले राजीनामे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे सोपविले. पण, याच वेळी काही पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यही राजीनाम्यासाठी पुढे सरसावले.

परंतु, ज्या अर्थी त्यांना विजयाचे प्रमाणपत्र निवडणुक निर्णय अधिकारी देतात त्याअर्थी राजीनामे स्विकारण्याचा अधिकारही निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनाच असतो. परंतु, अद्याप एकानेही जिल्हाधिकारी किंवा तहसिलदारांकडे राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे मंडे भगीनींबाबत एकनिष्ठता दाखविताना पद पण जाणार नाही याची चिंता तर या मंडळींना नाही ना असा सवाल उपस्थित होत आहे.

हे ही वाचा ः नितेश राणेंचा सूर बदलला, विकासासाठी शिवसेनेसोबत काम करण्याची ग्वाही..

Edited By : Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख