नाहीतर..१५ ऑगस्टला शेतकऱ्यांसह जलसमाधी घेणार  - Otherwise..will take Jalasamadhi with farmers on 15th August jp75 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

नाहीतर..१५ ऑगस्टला शेतकऱ्यांसह जलसमाधी घेणार 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 2 ऑगस्ट 2021

५० वर्षांपासून शेतकऱ्यांची मागणी असलेल्या तलावाचे काम मागच्या महायुती सरकारच्या काळात पुर्ण झाले. मात्र, सत्ताधारी व अधिकाऱ्यांनी संगणमताने शेतकऱ्यांच्या हिताचा तलावाचा सांडवा फोडला.

बीड : निकृष्ट रस्ता कामासाठी तलावाचा सांडवा फोडणाऱ्या आणि निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करुन १५ ऑगस्ट पर्यंत सांडवा दुरुस्त करा, अन्यथा शेतकऱ्यांसह जलसमाधी घेऊ असा इशारा भाजपचे नेते रमेश आडसकर यांनी दिला. (Otherwise..will take Jalasamadhi with farmers on 15th August, Bjp Warn Administration) पसिरातील आरणवाडी साठवण तलावा जवळून गेलेल्या खामगाव पंढरपूर महामार्गातील ५०० मीटर रस्त्याचे कामं बोगस झाल्याने गुत्तेदाराने स्वतःच्या राजकीय ताकदीचा वापर करत पाठबंधारे कार्यालयाशी संगणमत करून साठवण तलावाचा सांडवा फोडला.

५० वर्षांपासून मागणी असलेल्या तलावाची आरणवाडी साठवण निर्मिती व्हायला १७ वर्षे लागली. मागच्या वर्षी काम पूर्ण झाले आणि यंदा भरपूर पावसामुळे तलावात पाणीसाठाही मुबलक झाला. (Bjp Leader Ramesh Aadskar, Beed) परंतु, तलावातून गेलेल्या रस्त्याचे काम निकृष्ट झाले. ठेकेदार हा सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतला असल्याने त्याला वाचविण्यासाठी तलावाच्या सांडव्याची भिंत फोडण्याचा प्रताप अधिकाऱ्यांनी केला.  त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. दोन) रास्ता रोको केला. यावेळी आडसकर यांनी जलसमाधीचा इशारा दिला.

आरणवाडी साठवण तलावाचा सांडवा फोडण्यास  परिसरातील पाच ते सहा गावातील शेतकऱ्यांचा विरोध असताना पोलीस बळाचा वापर करून सांडवा फोडण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. सांडवा फोडणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, सांडवा पूर्ववत करावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी एकत्र येत आज रास्ता रोको केला. या आंदोलनास भाजप, शिवसेना, काँग्रेस, शेकापसह इतर राजकीय, सामाजिक पक्ष संघटनांनीही पाठिंबा दिला.

तहसीलदार वंदना शिडोळकर यांनी शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. आंदोलनाची माहिती असूनही जलसंधारण, एमएसआरडीचे अधिकारी गैरहजर राहिले. तहसीलदारांनी सकाळपसून संपर्क साधूनही घटनास्थळी कोणी फिरकले नाही, त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले. अधिकाऱ्यांना येथे हजर करा नसता आम्ही उठणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला. त्यामुळे गोंधळ निर्माण होऊन पोलिस व प्रशासनाची तारांबळ उडाली.

शेवटी तहसीलदार शिडोळकर यांनी स्थळ पंचनामा करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे लेखी आश्वासन दिले.  त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी माघार घेत रस्ता मोकळा केला.  पण प्रशासनाने हे प्रकरण  गांभीर्याने न घेतल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असा, इशाराही दिला.  पाटबंधारे विभाग केज येथील उपअभियंता साठे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क साधत ग्रामस्थांना ऑक्टोबर महिन्यापर्यंत सांडवा पुनर्बांधणी करून दिला जाईल, असे लेखी दिले. 

आंदोलनात अरणवाडी, चोरंबा, थेटेगव्हन, पहाडी पारगाव, पहाडी दहिफळ या पाच गावच्या शेतकऱ्यांसह विविध पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता. आडसकर यांच्यासह सभापती सुनील शिनगारे, सादिक इनामदार, बालासाहेब चव्हाण, काँग्रेसचे सिध्देश्वर रंधवे, प्रभाकर चव्हान, शिवसेनेचे बाळासाहेब कुरुंद, प्राचार्य विजय शिनगारे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी मायकर, राष्ट्रवादीचे सुरेश फावडे यांनीही यावेळी भूमिका मांडल्या.

हे ही वाचा ः बागडे-काळेंच्या राजकारणात शेळके अडकले..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख