मानपान नाट्य रंगले, आमदार श्यामसुंदर शिंदे समर्थक- भाजप कार्यकर्ते भिडले.. - MLA Shyamsunder Shinde supporters - BJP workers clashed .. | Politics Marathi News - Sarkarnama

मानपान नाट्य रंगले, आमदार श्यामसुंदर शिंदे समर्थक- भाजप कार्यकर्ते भिडले..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 28 जून 2021

प्रोटोकाल बाबत उपविभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा करतांना आमदार शिंदे मध्येच उठून तू कोण विचारणार ? तुला बघून घेईन, अशी असंवैधानिक भाषा वापरली.

कंधार ः येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या भूमिपूजन प्रसंगी प्रोटोकॉलवरून आमदार श्यामसुंदर शिंदे आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये खंडाजंगी झाली. सोमवारी येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या कार्यक्रमात नांदेड व लातूरचे खासदार व मुखेडचे आमदार यांचे नावे नसल्याने भाजपा कर्यकर्त्यांनी जाब विचारला. ( MLA Shyamsunder Shinde supporters - BJP workers clashed) त्यामुळे आमदार श्यामसूंदर शिंदे व भाजपा कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच शाब्दिक वाद झाला.

सोमवारी दुपारी उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे भूमिपूजन झाले. ( Mla Sahyamsunder Shinde) याप्रसंगी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना भाजपाचे तालुकाध्यक्ष भगवान राठोड व शहराध्यक्ष अॅड. गंगाप्रसाद यन्नावार यांनी नांदेड लोकसभेचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर, लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे व कंधार-मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड यांची नावे प्रोटोकॉल नुसार नसल्याचा मुद्दा उपस्थित केला.

शिवाय त्यांना निमंत्रणही पाठवण्यात आले नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. तर दुसरीकडे लोकप्रतिनिधी नसलेल्या आशाताई शिंदे यांची फोटो बॅनरवर का? लावला याचा जाबही भाजप पदाधिकाऱ्यांनी यावेळी विचारला.  हा वाद सुरू असतांना आमदार शिंदे यांनी देखील यात उडी घेतली.  भाजपा तालुकाध्यक्ष राठोडसह भाजप कार्यकर्त्यांना अरेरावीची भाषा वापरली.  यामुळे कार्यक्रमस्थळी एकच गोंधळ उडाला.

यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करून भाजपा कार्यकर्त्याना बाहेर काढले.  बाहेर येताच भाजपा कार्यकर्त्यांनी आमदारांच्या उद्दामपणाचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच काळे झेंडे दाखवून रोष व्यक्त केला. प्रोटोकाल बाबत उपविभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा करतांना आमदार शिंदे मध्येच उठून तू कोण विचारणार ? तुला बघून घेईन, अशी असंवैधानिक भाषा वापरली.

लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला प्रश्न विचारायचा हक्क हे आमदारांना कदाचित  माहीत नसेल. मी तांड्यावरचा लेकरू आहे. भीती आमच्या रक्तात नसते. त्यामुळे आमदारांनी अशी असंवैधानिक भाषा वापरून धमकी देऊ नये.  भाजप याचा निषेध करते, असे भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान राठोड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

हे ही वाचा ः वडेट्टीवार, भुजबळांना ओबीसी आरक्षणापेक्षा सत्तेचीच हाव..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख