ते केवळ राजकीय नाट्य; पूजा चव्हाणच्या आई-वडिलांच्या जबाबातील मोठा गौप्यस्फोट - pune police records statements of pooja chavans mother and father | Politics Marathi News - Sarkarnama

ते केवळ राजकीय नाट्य; पूजा चव्हाणच्या आई-वडिलांच्या जबाबातील मोठा गौप्यस्फोट

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 16 जुलै 2021

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाबाबत तिच्या आई-वडिलांचा जबाब वानवडी पोलिसांनी नोंदवला आहे. 

पुणे : पूजा चव्हाण (Pooja Chvan) आत्महत्या प्रकरणानंतर राज्यात मोठे राजकीय वादळ उठले होते. यामुळे तत्कालिन वनमंत्री व शिवसेनेचे आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांना राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणी आता पूजाच्या आई-वडिलांनी वानवडी पोलिसांकडे (Pune Police) जबाब नोंदवला आहे. मुलीच्या आत्महत्यानंतर घडलेला सर्व प्रकार हे राजकीय नाट्य होते, असा गौप्यस्फोट जबाबात करण्यात आला आहे. 

पुण्यातील वानवडीजवळील महंमदवाडी येथे 7 फेब्रुवारीला पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केली होती. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन  उडी मारून  तिने आत्महत्या केली होती. या प्रकरणी वानवड़ी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर वानवडी पोलिसांकडून पुढील तपासात कोणताही प्रगती झालेली नव्हती. या प्रकरणाच्या तपासाबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागल्यानंतर वानवडी पोलिसांकडून केवळ तपास सुरु असल्याचे उत्तर दिले जात होते. आता पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास सुरू केला आहे. 

हेही वाचा : काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी नव्हे तर वेगळ्याच कारणासाठी कमलनाथ अन् सोनिया गांधींची भेट 

वानवडी पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच पूजाच्या आई-वडिलांना पुण्यात बोलावून त्यांचा जबाब नोंदवला. पूजाच्या आत्महत्येचा राजकारणाशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी जबाबात म्हटले आहे. तसेच, पूजाच्या आत्महत्येस कोणीही जबाबदार नसल्याचेही त्यांनी जबाबात स्पष्ट केले. पूजाचा आत्महत्येनंतर घडलेला सर्व प्रकार म्हणजे राजकीय नाट्य असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.  

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पुणे पोलीस संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते. भाजपने या प्रकरणी पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर पोलिसांनी अतिशय सावध भूमिका घेतली होती. या प्रकरणाच्या तपासाबाबत पोलिसांकडून कोणतेही उत्तर दिले जात नव्हते. विशेषत: या प्रकरणाशी संबंधित कुठलीही माहिती बाहेर सांगू नये, अशी तंबीही पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख