काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी नव्हे तर वेगळ्याच कारणासाठी कमलनाथ अन् सोनिया गांधींची भेट

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
kamal nath says talk about my congress president post is rubbish
kamal nath says talk about my congress president post is rubbish

नवी दिल्ली : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal Nath) यांनी काँग्रेसच्या (Congress) हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट घेतल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. पक्षाच्या अध्यक्षपदासाठी ही भेट असल्याची चर्चा सुरू होती. अखेर कमलनाथ यांनीच याबाबत खुलासा केला आहे. त्यामुळे ही भेट वेगळ्याच कारणासाठी असल्याचे समोर आले आहे. 

कमलनाथ हे काल (ता.15) सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ या निवासस्थानी दाखल झाले.  काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत कमलनाथ आधीपासून आहेत. त्यामुळे ही भेट अध्यक्षपदासाठी होती, अशी चर्चा सुरू झाली होती. यावर कमलनाथ यांनीच अखेर खुलासा केला आहे. पक्षाच्या अध्यक्षपदाचा या भेटीशी काहीही संबंध नसल्याचा स्पष्ट निर्वाळा त्यांनी दिला आहे. 

मी काँग्रेस अध्यक्ष होणार ही चर्चा निराधार आहे. पक्षाशी निगडित विषयांवर माझी सोनिया गांधी यांच्याशी वेळोवेळी चर्चा होती. त्याच संदर्भात कालची भेट होती, असे कमलनाथ यांनी म्हटले आहे. पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट होती, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पंजाबमध्ये मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे पक्षाची डोकेदुखी वाढली आहे. 

कमलनाथ हे गांधी परिवाराच्या अतिशय जवळचे मानले जातात. ते माजी केंद्रीय मंत्री आहेत आणि त्यांनी नऊ वेळा संसदेचे सदस्य होते. ते पहिल्यांदा लोकसभेवर 1980 मध्ये निवडून गेले होते. ते काँग्रेसचे वरिष्ठ सदस्य आहेत. त्यांचे आणि कॅप्टन अमरिंदरसिंग यांचे अतिशय जवळचे संबंध आहेत. यामुळे पक्ष नेतृत्वाने या वादात कमलनाथ यांची मदत घेण्याचे पाऊल उचलले, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा दोन वर्षांपूर्वी राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. अध्यक्षपदाच्या निवडीबाबत  जानेवारी महिन्यात वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक झाली होती. या बैठकीत अध्यक्षपदाची निवडणूक जून महिन्यात घेण्याचा निर्णय झाला होता. यानंतर जून महिन्यात काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक झाली. यात 23 जूनला होणारी अध्यक्षपदाची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोना संकटामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याचे कार्यकारी समितीने म्हटले होते. 

मागील लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यांनी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला होता. शेवटी सोनिया गांधी यांनाच पुन्हा हंगामी अध्यक्ष म्हणून काम सुरू करावे लागले. पक्षाला अद्याप पुर्णवेळ अध्यक्ष न मिळाल्याने काही नेत्यांकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. सतत बैठका होऊनही कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होत नाही. त्यामुळे पक्षांतर्गत मरगळ दिसून येत आहे. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com