पृथ्वीराज चव्हाण म्हणतात...मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान करा! - Make Chief Minister Uddhav Thackeray the Prime Minister says Prithviraj Chavan | Politics Marathi News - Sarkarnama

पृथ्वीराज चव्हाण म्हणतात...मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान करा!

वृत्तसंस्था
रविवार, 18 जुलै 2021

पृथ्वीराज चव्हाण हे गांधी घराण्याचे कट्टर समर्थक मानले जातात.

पुणे :  पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून काँग्रेसकडून (Congress) सातत्याने राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचेच नाव पुढे केले जाते. पण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाच त्याचा विसर पडलाय की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लोकप्रिय आहेत, त्यांनांच पंतप्रधान करा, अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना दिली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. (Make Chief Minister Uddhav Thackeray the Prime Minister says Prithviraj Chavan)

पृथ्वीराज चव्हाण हे गांधी घराण्याचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळं ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. चव्हाण यांनी रविवारी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत विविध मुद्यांवर भाष्य केलं. देशभरातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये ठाकरे हे सर्वाधिक लोकप्रिय असल्याचं बोललं जात आहे. त्यावरून चव्हाण यांनी ठाकरे यांनाच पंतप्रधान करा, अशी प्रतिक्रिया दिली. 

हेही वाचा : नाना माझे मोठे बंधू पण जवळच्या लोकांनी चुकीचा मेसेज दिला!

मोदी सरकारवर टीका करताना चव्हाण म्हणाले, केंद्रात मोदी सरकार अस्तित्वात आल्यानंतर 32 ते 35 लाख कोटी रुपयांचे कर्ज काढण्यात आले आहे. त्यासाठी सातत्यानं कर वाढ केली जात आहे. कर्ज काढत असतानाच तोटा भरून काढण्यासाठी एलआयसीचे खासगीकरण, कंपन्यांची विक्री, खासगीकरण केले जात आहे. काँग्रेस सत्तेत असताना देशानं जे कमावलं ते मोदी सरकारने घालवले आहे. मोदी सरकारच्या काळात निंदनीय काम सुरू असल्याचे टीकास्त्र चव्हाण यांनी सोडलं. 

देशात मोठ्या प्रमाणावर इंधन दरवाढ झाली आहे. यामुळं नागरिकांचे कंबरडे मोडले असून ही दरवाढ केंद्र सरकारने मागे घ्यावी, अशी मागणीही चव्हाण यांनी यावेळी केली. चव्हाण यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केलं. ते दिशाभूल करत आहेत. खोटी विधानं करतात. ते सत्तेत असताना कोणते निर्णय घेतले? ते किती खोटं बोलतात यावर न बोलता मी त्याबाबतचे आकडे मांडले आहेत, असे चव्हाण म्हणाले.

राज्यातील नेत्यांवर ईडीकडून सुरू असलेल्या कारवायांवर चव्हाण यांनी संताप व्यक्त केला. अंगावर कुत्रं सोडल्यासारख्या या यंत्रमा सोडल्यात आल्या आहेत. आमच्या काळात असं झालं नाही. भाजपमध्ये असताना नेते धुतल्या तांदळासारखे होते. पक्ष बदलल्यानंतर काय झालं, असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख