भाजपमध्ये नाट्यमय घडामोडी : अखरे शंकर पवारांचा राजीनामा - Shankar Pawar resigns as PMPML director after drama in Pune BJP | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

भाजपमध्ये नाट्यमय घडामोडी : अखरे शंकर पवारांचा राजीनामा

मंगेश कोळपकर
बुधवार, 2 जून 2021

राजीनामा सादर करताना पवार यांच्यासमवेत नगरसेवक राहुल भंडारे तसेच तुषार पाटील उपस्थित होते.

पुणे : भारतीय जनता पक्षामधील नाट्यमय घडामोडींनंतर नगरसेवक शंकर पवार यांनी पीएमपीच्या संचालक पदाचा राजीनामा अखेर बुधवारी दिला.  (Shankar Pawar resings from PMPML)

पवार यांनी २८ मे रोजी संचालकपदाचा राजीनामा महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे दिला होता. परंतु, संचालक मंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत तांत्रिक कारणास्तव तो मंजूर झाला नव्हता. त्यानंतर मोहोळ, सभागृहनेते गणेश बिडकर यांची प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा झाली. त्यानंतर पवार यांनी बुधवारी सायंकाळी पाटील यांची भेट घेतली आणि मोहोळ यांच्याकडे राजीनामा दिला. आता हा राजीनामा मंजूर करण्यासाठी पीएमपीला संचालक मंडळाची बैठक बोलवावी लागेल. त्यात तो मंजूर झाल्यावर महापालिकेला कळविले जाईल. त्यानंतर तेथे नव्या संचालकांची निवड करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू होईल. राजीनामा सादर करताना पवार यांच्यासमवेत नगरसेवक राहुल भंडारे तसेच तुषार पाटील उपस्थित होते. संचालक पद रिक्त झाल्यामुळे आता इच्छूकांचे लॉबिंग सुरू झाले आहे. 

वाचा आधीची बातमी : शंकर पवार यांच्या राजीनाम्याचे नाट्य

पीएमपीच्या संचालकपदाचा शंकर पवार यांनी चार दिवसांपूर्वी शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांच्याकडे राजीनामा दिला. मुळीक यांनी तो राजीनामा महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे दिला. त्यांनी तो राजीनामा जगताप यांच्याकडे पाठविला. या पार्श्वभूमीवर पीएमपीच्या संचालक मंडळाची बैठक मंगळवारी झाली. या बैठकीत पवार यांना निरोप देण्यासाठी पीएमपीने पुष्पगुच्छ आणला. तसेच बैठकीचे कामकाज सुरू झाल्यावर आपल्याला थांबता येणार नाही, अशी कल्पनाही त्यांना देण्यात आली. मात्र, महापौर मोहोळ बैठकीसाठी येताना ते पवार यांना घेऊन आले. त्यावेळी तांत्रिक कारणामुळे पवार यांचा राजीनामा मंजूर झाला नाही. आता महापौर मोहोळ हा राजीनामा मंजूर करून पीएमपीकडे पाठवितील. 

 पीएमपीच्या संचालक मंडळाची बैठक तीन महिन्यांतून एकदा घेण्याचे बंधन आहे. ही बैठक १ जून रोजी झाल्यामुळे आता पुढची बैठक केव्हा होणार, याकडे लक्ष लागले आहे. दोन्ही शहरांचे महापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष, आयुक्त, प्रादेशिक परिवहन अधिकारी, सीआयआरटीचे प्रतिनिधी आदींचा समावेश या बैठकीत आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत राजीनाम्याला मंजुरी मिळाल्यावर त्याचे पत्र महापालिकेत नगरसचिव कार्यालयात जाईल. त्यानंतर संचालक मंडळाच्या निवडीसाठी सर्वसाधारण सभेच्या कार्यपत्रिकेवर हा विषय येईल. त्यानंतर निवडणूक होईल, मतदान झाल्यावर नवा संचालक निवडला जाईल. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख