पुण्यासाठी दिलासादायक आकडेवारी : नवे फक्त 1165 रुग्ण, पाॅझिटिव्हीटी रेट दहा टक्के! - Pune city gets relief in corona second wave as positivity rate drops to 10 percent | Politics Marathi News - Sarkarnama

पुण्यासाठी दिलासादायक आकडेवारी : नवे फक्त 1165 रुग्ण, पाॅझिटिव्हीटी रेट दहा टक्के!

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 10 मे 2021

कठोर लाॅकडाऊनची शक्यता संपल्याची अपेक्षा

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गेले दीड महिना हतबल झालेल्या पुणेकरांसाठी महत्वाची बातमी असून पुण्यात 10 मे रोजी केवळ 1165 रुग्णांची वाढ झाली आणि तब्बल 4010 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. सर्व सरकारी यंत्रणांनी पुण्याचा पाॅझिटिव्हिटी रेट (corona positivity rate कूण चाचण्यांमध्ये आढळणारे कोरोना रुग्ण) हा दहा टक्क्यांपर्यंत आणण्याची उद्दीष्ट ठेवले होते. ते पण आज साध्य झाले. यामुळे पुण्यात दुसरी लाट ओसरू लागल्याचे हे चिन्ह मानण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा स्प्रेडही कमी झाला आहे. (covid second wave declining in Pune) 

पुण्यात गेल्या दीड महिन्यात एकाच दिवशी आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची कमाल संख्या ही सात हजारावर गेली होती. 25 हजार चाचण्या झाल्या तर तीस टक्के पाॅझिटिव्हीटी रेट याप्रमाणे सुमारे सहा ते सात हजार रुग्णांची रोज नव्याने भर पडत होती. रुग्णालयांत जागा मिळण्यापासून ते व्हेंटिलिटर मिळण्यासाठी प्रचंड धावपळ आणि कष्ट करावे लागत होते. आता आॅक्सिजनचे बेडही अनेक रुग्णालयांत सहज उपलब्ध होत आहे. आज पुण्यात 1402 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याशिवाय 6236 आॅक्सिजनवरील उपचार घेणारे रुग्ण आहेत.  पुणे शहरातील  कोरोनाबाधीत 51 रुग्णांचा मृत्यू आज झाला.  तसेच पुण्याबाहेरील 23  रूग्णांचा मृत्यूंची नोंद झाली.  ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ही 30836 पर्यंत खाली गेली आहे. हा आकडा 18 ते 25 एप्रिल दरम्यान दीड लाखांपर्यंत पोहोचला होता. पुण्यात दहा मे रोजी  केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी संख्या 11499 इतकी होती. त्याच्या दहा टक्के रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

वाचा ही बातमी : निंबूतचे लाला पोहोचले थेट दिल्लीत!

पुण्यात पुन्हा कडक लाॅकडाऊन लावण्याची भाषा उच्च न्यायालयात झाली होती. त्यामुळे व्यापारी, व्यावसायिक यांचे धाबे दणाणले होते. त्या तुलनेत ही आकडेवारी दिलासा देणारी आहे. पुढील काळात ही आकडेवारी यंत्रणावरील भार आणखी कमी करणारी असेल, अशी आरोग्य खात्याला अपेक्षा आहे.

मंगळवार, दि. ११ मे २०२१ चे लसीकरण नियोजन!

१) १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी उद्या २ केंद्रांवर लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. यात दोन्ही केंद्रांवर कोविशील्ड उपलब्ध असेल.

२) ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी उद्या ५० केंद्रांवर लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. यात ४० केंद्रांवर कोविशील्ड तर १० केंद्रांवर कोवॅक्सिन उपलब्ध असेल.

- कोवॅक्सिन उपलब्ध असणाऱ्या १० केंद्रांवर १३ एप्रिल २०२१ पूर्वी पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनाच दुसरा डोस दिला जाईल.

- कोविशील्ड उपलब्ध असणाऱ्या केंद्रांवर २७ मार्च २०२१ पूर्वी पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांना प्राधान्य असेल. तसेच अपॉइंटमेंटनुसार येणाऱ्या २० टक्के नागरिकांना पहिला डोस दिला जाणार आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख