कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतलेले खासदार डॉ.कोल्हे 'पॉझिटिव्ह'

कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्यावरही शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतलेले खासदार डॉ.कोल्हे 'पॉझिटिव्ह'
ncp mp amol kolhe testesd covid19 positive

पिंपरी : कोरोना (Covid-19) प्रतिबंधक लसीचे (Covid Vaccine) दोन डोस घेतल्यावरही शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे  (NCP) खासदार डॉ.अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांनी स्वत:च ट्विट करीत याची माहिती काही वेळापूर्वीच दिली. तसेच, संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

कोरोनाचे संकट अजूनही टळलेलं नाही,असे सूचक ट्विट त्यांनी केले आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. कोरोना संसर्गामुळे पूर्वनियोजित दौरे त्यांनी पुढे ढकलले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना कोरोनासदृश लक्षणे दिसत होती. बैलगाडा शर्यतीवरील चर्चेत काल (ता.१९) भाग घेतानाही ते स्पष्टपणे जाणवतही होते. त्यामुळे त्यांनी कोरोनाची आरटी-पीसीआर चाचणी केली .तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पुन्हा खात्री करण्यासाठी थोड्या वेळापूर्वी ते पुण्यातील केईएम रुग्णालयात गेले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार  त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत.

दरम्यान, डॉ.कोल्हेंना किमान १४ दिवस आता विलगीकरणात राहावे लागणार आहे. त्यामुळे बंद पडलेली बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु करण्याच्या त्यांनी सुरु केलेल्या प्रयत्नांना तूर्तास ब्रेक लागला आहे. या आठवड्यातच ते यासंदर्भात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेणार होते. केंद्रीय पशुसंवर्धनमंत्री परषोत्तम रुपाला यांनाही ते भेटणार होते. 

ओझर (ता.जुन्नर,जि.पुणे) येथे नुकतीच त्यांनी बैलगाडा शर्यतीचे शौकीन, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे प्रतिनिधी व लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन ही शर्यत पुन्हा सुरु करण्यासाठी एल्गार पुकारला होता. आंदोलन न करता ही शर्यत सुरु कशी करता येईल,या दिशेने व दृष्टीने त्यांनी प्रयत्नही सुरु केले होते.
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in