शिवसेना अन् राष्ट्रवादीच्या श्रेयवादात आता भाजपची उडी - Mahesh Landge and Bala Bhegde slams NCP and Shivsena Leaders | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

शिवसेना अन् राष्ट्रवादीच्या श्रेयवादात आता भाजपची उडी

उत्तम कुटे
रविवार, 18 जुलै 2021

पुणे-नाशिक महामार्ग बाह्यवळणाच्या कामाच्या श्रेयबाजीवरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत जुंपली आहे.

पिंपरी : पुणे-नाशिक महामार्ग बाह्यवळणाच्या कामाच्या श्रेयबाजीवरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत जुंपली असताना त्यात आता भाजपनेही उडी घेतली आहे. या कामाचे श्रेय जनता आणि केंद्राचे म्हणजेच रस्ते व महामार्गमंत्री नितीन गडकरींचे असल्याचे भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष व भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले. तर, जनतेच्या हितासाठी नाही, तर स्वत:च्या स्वार्थासाठी स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये आलबेल नसल्याचे या श्रेयबाजीतून दिसून येत आहे, असे माजी मंत्री व मावळचे माजी आमदार बाळा भेगडे म्हणाले. (Mahesh Landge and Bala Bhegde slams NCP and Shivsena Leaders)

राज्यात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनमध्ये पुणे जिल्ह्यात व त्यातही शिरूर लोकसभा मतदारसंघात वाद वाढीस लागल्याचे यानिमित्ताने पुन्हा स्पष्ट झाले आहे. खेड तालुका पंचायत समिती सभापतींच्या अविश्वास ठरावावरून याअगोदर  शिरुरचे माजी खासदार व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव-पाटील आणि खेडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्यात खडाजंगी झाली होती. 

हेही वाचा : नाना माझे मोठे बंधू पण जवळच्या लोकांनी चुकीचा मेसेज दिला!

त्यात खुद्द शिवसेना नेते व मुख्य प्रवक्ते असलेले खासदार संजय राऊत ()Sanjay Raut) यांनी उडी घेत स्थानिक राष्ट्रवादीवर सडकून टीका केली ती. त्यानंतर खेड व नारायणगाव बाह्यवळण मार्गावरून आता पुन्हा याच दोन पक्षांत जुंपली आहे. यावेळचे आरोप, प्रत्यारोप आजी-माजी खासदारांत म्हणजे डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) व आढळराव यांच्यात झाले आहेत. त्यात शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रवक्त्याने उडी घेत कोल्हेंवर लगेचच कडवट टीका केली. 

पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाटातील बाह्यवळण रस्त्याचे उदघाटन कोल्हे यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता.१७) झाले. मात्र, हे काम आपण आणल्याचे सांगत आढळराव यांनी हा मार्ग एक दिवस अगोदरच शुक्रवारी (ता.१६) खुला केला. त्यावरून वय झालेल्या आढळरावांनी आता पोरकटपणा करू नये, अशी कडवट टीका कोल्हेंनी काल केली. त्याचा समाचार शिवसेनेच्या मुख्य कार्यालयातून लगेचच घेण्यात येऊन कोल्हेंनी अकलेचे तारे तोडत आपल्या बुद्धीचे सामूहिक दर्शन घडवल्याचा हल्लाबोल केला होता.

शिवसेना, राष्ट्रवादीतील ही सुंदोपसुंदी व श्रेयाच्या लढाईत आता  भाजपने उडी घेतली आहे. ज्यांनी भाजपचे सरकार निवडून दिले, त्या सर्वसामान्य नागरिकांचे हे श्रेय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या दुरदृष्टीमुळे खेड व नारायणगाव बायपासच नाही, तर खेड ते नाशिक फाटा रस्त्याचेही काम मार्गी लागल्याचे सांगत आमदार लांडगे यांनी शिवसेनेबरोबर राष्ट्रवादीलाही उघडे पाडले आहे. या दोघांवर थेट टीका न करताही त्यांनी आपले आदराचे राजकारण (पॉलिटिक्स विथ रिसपेक्ट) धोरणही अबाधित ठेवले. 

तर माजी मंत्री आणि मावळचे माजी आमदार बाळा भेगडे यांनी जनतेच्या हितासाठी नाही तर स्वत:च्या स्वार्थासाठी एकत्र आलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये सारे काही आलबेल नाही, असे भाष्य शिवसेना, राष्ट्रवादीमध्ये रंगलेल्या कलगीतुऱ्यावर केले. या महामार्गाच्या कामाला गती दिल्याने गडकरींचे अभिनंदन करीत याचे श्रेय त्यांनी आपसूक गडकरी व पर्यायाने भाजप तथा केंद्र सरकारला दिले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यांवरून त्यांना राज्यातील जनतेपेक्षा स्वत:चा स्वार्थ कोठे, हे लक्षात आलेले आहे, अशी तोफही भेगडेंनी डागली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख