भेसळ उघड करण्यासाठी पोलिसांना बोलवले अन् स्वत:च खंडणीखोरीत अडकले
Human rights activists arrested in ransom case in PCMC

भेसळ उघड करण्यासाठी पोलिसांना बोलवले अन् स्वत:च खंडणीखोरीत अडकले

या टोळीला १५ तारखेपर्यंत पोलिस कोठ़डीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने रविवारी (ता.12) दिला.

पिंपरी : मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेच्या आड पदाधिकारी कसे खंडणी उकळतात हे पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी (ता.11) दिसून आले. एका होलसेल दुकानदारावर धान्यात भेसळीचा आरोप करून या भ्रष्टाचार निवारणच्या सात कार्यकर्त्यांनी 25 लाखांची मागणी केली. ती न मिळाल्याने दुकानदारावर बाजू  उलटवण्यासाठी त्यांनी पोलिसांना बोलावले अन स्वत:च जाळ्यात अडकले. त्यात एक तरुणीही आहे. (Human rights activists arrested in ransom case in PCMC)

दरम्यान, या टोळीला १५ तारखेपर्यंत पोलिस कोठ़डीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने रविवारी (ता.12) दिला. `मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटन` (HUMAN RIGHTS AND ANTI-CORRUPTION ORGANISATION OF INDIA)ची ओळखपत्रे गळ्यात घालून राष्ट्रीय अध्यक्ष सतीश केदारी व त्यांच्या सहा पदाधिकाऱ्यांनी रहाटणी येथील बालाजी ट्रेडर्स या दुकानात शुक्रवारी (ता. 10) सायंकाळी एंट्री केली.

दुकानाचे मालक सुरजाराम चौधरी (वय 37, मूळचे रा. राज्यस्थान, सध्या तळेगाव दाभाडे. ता.मावळ, जि.पुणे) यांना तुम्ही धान्यात भेसळ करता असे ते म्हणाले. त्यासाठी दहा वर्षे जेलमध्ये जावे लागेल, असे धमकावले. ते जर नको असेल, तर 25 लाख रुपये देण्याची मागणी त्यांनी केली. ते देऊ शकत नाही, असे दुकानदार म्हणाले. 

त्यावर त्यांनी दुकानदारांच्या भावाच्या खिशातील साडेआठ हजार रुपये काढून घेतले. यानंतर आपली चोरी पकडली जाऊ नये व दुकानदारच अडचणीत यावा म्हणून त्यांनी पोलिसांना बोलावले. मात्र,या तथाकथित मानवाधिकार व भ्रष्टाचार संघटनेचा व तिच्या पदाधिकाऱ्यांचा वाकड पोलिसांच्या सतर्कतेमुळे भंडाफोड़ झाला. अशा आणखी काही संघटना व त्यांचे पदाधिकारी शहरात असून त्यांच्यापासून सावध राहावे, असे आवाहन वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी केले आहे.

या भ्रष्टाचार व मानवाधिकार संघटनेचा अध्यक्ष केदारी स्वत:च्या नावापुढे डॉ. ही उपाधीही लावतो आहे. ती सुद्धा बोगस असल्याचा संशय आहे. हेमंत निवगुणे, कपील राक्षे, किरण घोलप, आदित्य जेधे, तानाजी मस्तूद, ज्योत्स्ना पाटील अशी बाकीच्या खंडणीखोर मानवाधिकार तथा भ्रष्टाचार निवारण पदाधिकाऱ्यांची नावे असल्याचे तपासाधिकारी अभिजीत जाधव यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in