भाजपला दे धक्का! अजितदादांच्या उपस्थितीत नाराज नेत्याची घरवापसी

सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातच भाजपला गळती लागली आहे.
भाजपला दे धक्का! अजितदादांच्या उपस्थितीत नाराज नेत्याची घरवापसी
bjp former corporator raju lokhande joins ncp

पिंपरी : मागील वेळी २०१७ मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेत (PCMC) भाजपचे (BJP) सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातच भाजपला गळती लागली आहे. शहर कारभारी आणि चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपळे गुरव भागातील माजी नगरसेवक राजू लोखंडे (Raju Lokhande) यांनी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) घरवापसी केली. 

लोखंडे हे भाजपच्या विद्यमान नगरसेविका व महिला व बालकल्याण समितीच्या सभापती चंदा लोखंडे यांचे पती आहेत. त्यांच्यासह पिंपळे गुरवमधील प्रभाग २९ मधून निवडून आलेले चारही नगरसेवक भाजपचेच आहेत. दरम्यान, लोखंडे यांच्यानंतर त्यांच्या पत्नीही राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. ही शक्यता लोखंडे यांनीही फेटाळली वा नाकारली नाही. फक्त ती नंतरची गोष्ट आहे, असे ते सूचकपणे म्हणाले. म्हणजे नगरसेवकपदाची टर्म संपता संपता निवडणूक जाहीर होण्याच्या तोंडावर चंदा लोखंडेही राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. 

चिंचवडमधीलच भाजपच्या दुसऱ्या नगरसेविकेनेही पक्षाच्या कार्यक्रमांना जाणे थांबवले असून त्याही आपली टर्म संपताच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यांचे पती,मात्र त्याअगोदरच राष्ट्रवादीत येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भोसरीतीलही भाजपच्या एका तरुण नगरसेवकानेही पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे जवळपास नक्की केले आहे.

दरम्यान, समाजाच्या प्रश्नांसाठी, भल्यासाठी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे लोखंडे यांनी आज 'सरकारनामा'ला सांगितले. चारचाच प्रभाग असताना २००२ ला ते राष़्ट्रवादीकडून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. आमदार जगताप यांचे ते त्यावेळी कट्टर समर्थक होते. त्यामुळे जगतापांनी भाजपमध्ये प्रवेश करताच २०१७ च्या पालिका निवडणुकीवेळी त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्यांचा वॉर्ड हा महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांनी पत्नीला उभे केले होते.

पु्णे जिल्ह्यातील कोरोना आढावा बैठक 20 ऑगस्टला पुण्यातील विधानभवनात उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी राज्यातील आपल्या वैदू समाजाचे प्रश्न घेऊन लोखंडे हे पवारांना भेटले. त्यावेळी सर्वच प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांना देण्यात आले. त्यासाठी दादांनी घरवापसीचे आवताण देताच मी कसलाही पुढचा मागचा विचार  न करता समाजाच्या भल्यासाठी राष्ट्रवादीत परतण्याचा निर्णय घेतला, असेही लोखंडे यांनी सांगितले.

याआधी १९ मे रोजी भाजपचे दुसरे कारभारी आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या मतदारसंघातील पक्षाच्या शहर ओबीसी महिला मोर्चाच्या माजी शहराध्यक्षा सारिका पवार यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत केला होता. त्या एकनाथ खडसे यांच्या कट्टर समर्थक आहेत. नाथाभाऊंनी गेल्यावर्षी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करताच त्यांनीही लगेचच आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. मात्र, त्यानंतर सहा महिन्यांनी त्यांनी आपल्या नेत्याच्या मागे राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in