खासदार अमोल कोल्हेंनी गिरवला फडणवीसांचा कित्ता!

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी कोरोना संसर्ग झाला आहे. ते उपचारासाठी मुंबई महापालिकेच्या कोरोना सेंटरमध्ये दाखल झाले आहेत.
ncp mp amol kolhe admitted in government hospital in mumbai
ncp mp amol kolhe admitted in government hospital in mumbai

पिंपरी : कोरोना प्रतिबंधक लस (Covid Vaccine) घेतली म्हणजे कोरोना होणार नाही, हा गैरसमज आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे  खासदार डॉ अमोल कोल्हे (Amoh Kolhe) यांनी आज सांगितले. कोरोना लशीचे दोन्ही डोस घेऊनही त्यांना कोरोना (Covid19) संसर्ग झाला आहे. दरम्यान,सरकारी व्यवस्थेवर विश्वास असल्याचे सांगत ते मुंबई महापालिकेच्या कोरोना सेंटरमध्ये दाखल झाले आहेत. याआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेसुद्धा कोरोना झाल्यानंतर सरकारी रुग्णालयात दाखल झाले होते. 

फडणवीस हे कोरोना संसर्ग झाल्यानंतर खासगी पंचतारांकित रुग्णालयात दाखल होण्याऐवजी मुंबईतील सरकारी रुग्णालयातच दाखल झाले होते. आता खासदार कोल्हेंनीही त्यांचा कित्ता गिरवला आहे. ते मुंबईत परळ येथे राहतात. त्यांना दोन दिवसांपासून कोरोनाची लक्षणे दिसून येत होती. त्यामुळे त्यांनी खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणी केली. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांनी काल सरकारी रुग्णालयात जाऊन खातरजमा केली. तेथेही दुजोरा मिळाल्याने वेळ न दवडता ते महापालिकेच्या सेव्हन हिल्स कोरोना रुग्णालयात दाखल झाले. 

सरकारी व्यवस्थेवर विश्वास असल्याने आपण सरकारी रुग्णालयात दाखल झाल्याचे ट्विट कोल्हे यांनी आज केले. राज्य सरकारची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सक्षम असून त्यावर विश्वास आहे म्हणून कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर सरकारी रुग्णालयाचा पर्याय निवडला. आपण आपल्या व्यवस्थांवर विश्वास दाखविला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे. दोन्ही डोस घेऊनही कोरोना झाल्याने या साथीचा धोका पूर्णपणे टळलेला नाही, याची प्रचिती आली. लशीलाही दाद न दिल्याने आपल्याला झालेला कोरोना हा नवा डेल्टा व्हेरीएंट असू शकतो. कारण तो लस घेतल्यानंतरची प्रतिकारशक्ती सुद्धा भेदू शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे. 

लस घेतली म्हणजे धोका टळला असे समजून गाफिल राहू नका. सर्वांनी कोरोनाचे नियम निर्बंध काटेकोरपणे पाळा, असे आवाहन कोल्हे यांनी केले आहे. दरम्यान, त्यांना कोरोना होताच त्यांच्या असंख्य  हितचिंतकांनी विविध माध्यमांतून काळजी व्यक्त केली आहे. त्याबद्दल कोल्हेंनी सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत. दरम्यान, ते कोरोनाग्रस्त झाल्याने बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु करण्याच्या त्यांच्या प्रयत्नाला तूर्तास ब्रेक लागला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com