लाचखोर कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी घरी पाठवलं पण भाजपकडून स्थायी अध्यक्षांवर कारवाई कधी?

स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांच्यावर महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून कारवाई झालेली नाही.
लाचखोर कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी घरी पाठवलं पण भाजपकडून स्थायी अध्यक्षांवर कारवाई कधी?
pcmc commissioner rajesh patil suspends 4 employees

पिंपरी : लाचखोरीत अटक झालेल्या पिंपरी महापालिकेच्या (PCMC) चार कर्मचाऱ्यांना आयुक्त राजेश पाटील (Rajesh Patil) यांनी निलंबित केले असून, त्यांची खातेनिहाय चौकशीही सुरु केली आहे. दुसरीकडे, याच गुन्ह्यात पकडलेले स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे (Nitin Landge) यांच्यावर,मात्र अद्याप अशी कारवाई महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून (BJP) झालेली नाही.

गेल्या बुधवारी (ता.१८) एका जाहिरात ठेकेदाराकडून एक लाख १८ हजार रुपयांची लाच घेताना पाच जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अटक केली. त्यांना आजपर्यंत (ता.२१) पोलीस कोठडी मिळाल्याने दोन लिपिक तथा कारकून (क्लार्क), एक संगणक चालक (कॉ़म्पुटर ऑपरेटर) आणि एक शिपाई अशा चार महापालिका कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी लगेचच दणका देत निलंबित केले. त्यांच्याविरुद्ध खातेनिहाय चौकशीही लावली आहे. दुसरीकडे भाजपने लांडगे यांच्याविरुद्ध अद्याप कसलीही कारवाई केलेली नाही. या प्रकरणातील दोषींवर योग्य ती करू, असे आश्वासन फक्त भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. त्यासाठी त्यांनी सत्यशोधन समिती नेमली. तिचा अहवालही त्यांना काल देण्यात आला. त्यानुसार ते कारवाई करणार आहेत. मात्र,अद्याप ती झालेली नाही. 

एसीबीचा अहवाल काल (ता.२०) प्राप्त होताच आयुक्तांनी लगेच कालच त्यावर कारवाई केली. लाच प्रकरणात पकडल्या गेलेल्या चार कर्मचाऱ्यांमुळे महापालिकेची बदनामी झाल्याने ४८ तास कोठडीत राहिलेल्या या चौकडीला त्यांनी निलंबित केले. स्थायी समिती कार्यालयातील मुख्य लिपिक ज्ञानेश्वर किसन पिंगळे, लिपिक विजय शंभूलाल चावरिया, संगणकचालक राजेंद्र जयवंतराव शिंदे आणि शिपाई अरविंद भीमराव कांबळे अशी त्यांची नावे आहेत. निलंबनकाळात त्यांना शहर सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. दरम्यान, आज त्यांना न्यायालय पुन्हा कोठडी वाढवून देते की न्यायालयीन कोठडी देऊन त्यांना जामिनावर सुटण्याचा मार्ग मोकळा करते, याकडे लक्ष लागले आहे. तसेच या प्रकरणात आणखी काही नवे आरोपी एसीबीच्या तपासात निष्पन्न होतात का हे ही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. लांडगे व पिंगळे यांच्या घरझडतीत घबाड मिळाले आहे का तेही आज कळून येणार आहे.

दरम्यान, या स्थायी अध्यक्षांसह चौघा कर्मचाऱ्यांचा बळी स्थायीतील रुढ टक्केवारी पद्धतीने घेतल्याची महापालिकेत चर्चा सुरु आहे. या पदावर सज्जन व्यक्ती बसली, तरी तिला या खुर्चीचा गुण नाही, पण वाण लागतो आणि त्यालाही या रुळलेल्या टक्केवारीच्या वाटेवरून नाईलाजाने चालणे भाग पडते. त्यातील मुख्य लिपिक व शिपाई हे,तर स्थायी अध्यक्षांसारखेच मितभाषी व कोणाच्या अध्यातमध्यात न पडणारी व्यक्तीमत्वे आहेत. मात्र, टक्केवारीच्या सिस्टीमचा ती बळी ठरली. या पायंडा पडलेल्या सिस्टीमनुसार अध्यक्षांना वागावे लागले आणि नाईलाजाने त्यांचा कित्ता त्यांचे पीए व इतर कर्मचाऱ्यांना गिरवावा लागला.

कोहली अॅडव्हरटायझिंग या जाहिरातदार संस्थेच्या मंजूर सहा निविदांची वर्कऑर्डर काढण्यासाठी निविदेच्या दोन टक्के रक्कम लाच म्हणून त्यांनी स्वीकारली. एसीबीने थेट स्थायी समितीच्या कार्यालयावरच धाड टाकून ही कारवाई केली. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच पालिकेच्या स्थायी समितीवर छापा पडल्याने शहरातच नाही,तर राज्यात या कारवाईची मोठी चर्चा झाली.  महापालिकेच्या खजिन्याची चावी असलेल्या  समितीचा अध्यक्ष हा मोठा पदाधिकारी मासा त्यात गळाला लागल्याने मोठी खळबळ उडाली.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in