पुलाच्या उद्घाटनावरून सत्ताधारी भाजप अन् राष्ट्रवादी आमनेसामने - The inauguration of the bridge has sparked the ruling BJP and NCP | Politics Marathi News - Sarkarnama

पुलाच्या उद्घाटनावरून सत्ताधारी भाजप अन् राष्ट्रवादी आमनेसामने

उत्तम कुटे
बुधवार, 30 जून 2021

शहरातील दोन पूलांचे उद्घाटन याआधीही अशा राजकीय श्रेयबाजीतून एकदा नव्हे, तर दोनदा झालेले आहे.

पिंपरी : पिंपरी महापालिकेची निवडणूक जवळ आल्याने सत्ताधारी भाजप व विरोधी राष्ट्रवादीत विकासकामांवरून श्रेयाचे  राजकारण आता सुरु झाले आहे. त्यातून शहराच्या निगडीतील दुमजली उड्डाणपुलाचे काम आपल्या काळात मंजूर झाल्याचा दावा करीत राष्ट्रवादीने त्याचे उद्घाटन बुधवारी (ता. ३०) आपला नवा राजकीय मित्र शिवसेनेसह केले. सत्ताधारी भाजपच्या आधी हे उद्धघाटन उरकल्याने भाजपचा संताप झाला आहे. आपल्या राजवटीत या प्रकल्पाला मान्यता मिळाल्याचा प्रतिदावा भाजपने करीत निवडणूक जवळ आल्याने राष्ट्रवादीने नसलेले अस्तित्व दाखविण्यासाठी हा उद्घाटनाचा आटापिटा केल्याचा पलटवार केला.

शहरातील दोन पूलांचे उद्घाटन याआधीही अशा राजकीय श्रेयबाजीतून एकदा नव्हे, तर दोनदा झालेले आहे. आज त्याची हॅटट्रिक झाली. जिल्ह्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते निगडीच्या भक्तीशक्ती चौकातील या पूलाचे उद्घाटन करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली होती. तर, भाजपला ते आपल्या नेत्याच्या हस्ते करायचे होते. त्यामुळे काम पूर्ण होऊनही तो खुला झाला नव्हता. त्यामुळे स्थानिक रहिवाशांची मोठी अडचण होत होती. त्यांना अडीच किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत होते. त्यामुळे राष्ट्रवादीने सत्ताधाऱ्यांच्या अगोदरच हा पूल खुला केला. परिणामी आता भाजपही त्याचे औपचारिक उद्घाटन बहूधा महापौरांच्या हस्ते करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : तेवीस गावांच्या समावेशानंतर कशी असेल पुणे शहराची हद्द; जाणून घ्या...

राष्ट्रवादीच्या पालिकेतील सत्ताकाळात मान्यता मिळालेल्या शहरातील महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी हा एक पूल असल्याचे पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी सांगितले. त्याचे काम पूर्ण झाल्याने त्याचे उद्धाटन करण्याची मागणी होती. मात्र, तो खुला न झाल्याने परीसरातील रहिवाशांत असंतोष होता. तो व त्यांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन या पुलाचे उद्घाटन केल्याचे ते म्हणाले. पालिकेतील विरोधी पक्षनेते राष्ट्रवादीचे राजू मिसाळ, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, शहर प्रवक्ते फजल शेख, शहर युवती अध्यक्षा वर्षा जगताप, युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, भोसरी महिला विधानसभा अध्यक्षा मनिषा गटकळ, शिवसेनेचे नगरसेवक अमित गावडे आदी यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, भक्ती शक्ती चौकातील या उड्डाणपुलाची किरकोळ कामे बाकी आहेत. तरीही राष्ट्रवादीने स्टंटबाजी करण्यासाठी या उड्डाणपुलाचे उद्घाटन केले, असा पलटवार सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी लगेचच केला. पालिकेत सत्तेत आल्यानंतर भाजपाने पहिल्याच वर्षी म्हणजे २०१७ ला या वर्तुळाकार उड्डाणपुल व ग्रेडसेपरेटरच्या कामाला मंजुरी दिल्य़ाचा दावा त्यांनी केला. पुलाचे काम पुर्ण झाले आहे, असे एकीकडे सांगताना दुसरीकडे किरकोळ कामे कोरोनामुळे अजुनही होणे बाकी आहेत, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादीप्रमाणे ठेकेदार हित न जोपासता व कुठलाही वाढीव खर्च न करता भाजपाने हे काम पुर्ण केले याचे राष्ट्रवादीने आत्मचिंतन करावे, असा हल्ला त्यांनी चढवला. मात्र, सत्तेविना तडफड होत असल्याने राष्ट्रवादीने स्टंटबाजीसाठी करत या उड्डाणपुलाचे उद्घाटन केले आहे, असे ते म्हणाले.

मलई खायला मिळत नसल्यामुळे भाजपाच्या कामांमध्ये राष्ट्रवादीचा हा हस्तक्षेप असल्याचे भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे म्हणाले. भाजपच्या कामाचे श्रेय लाटण्याची कमर्शियल विरोधी पक्षनेते राष्ट्रवादीचे राजू मिसाळांची ही  केविलवाणी धडपड असल्याची खरपूस टीका त्यांनी केली. पुणे-मुंबई महामार्गावरील शहराच्या पश्चिम प्रवेशव्दारावरील या पूलाचे काम पूर्ण झाले नसतानाही तो खुला करण्यात आल्याने वाहनचालकांना धोका निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला. कारण पूल सुरू केल्यानंतर ही कामे सुरू ठेवल्यास वाहतुकीला अडथळा येऊन छोटे-मोठे अपघात होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. प्रत्येक विकासकामांच्या निविदेत लक्ष घालून ठेकेदारांना वेठीस धरणा-या विरोधी पक्षनेत्याने भाजपला आव्हान देण्याची हिम्मत दाखवू नये, ते खूप महागात पडेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख