भाजप आमदाराला हॅकरचा दणका...फेसबुक अकाउंटवरुन केली पैशांची मागणी - bjp mla laxman jagtap facebook account hacked by hackers | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप आमदाराला हॅकरचा दणका...फेसबुक अकाउंटवरुन केली पैशांची मागणी

उत्तम कुटे
सोमवार, 19 जुलै 2021

पिंपरी चिंचवड शहराचे कारभारी भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे फेसबुक अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. 

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहराचे कारभारी भाजप (BJP) आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे फेसबुक (Facebook) अकाउंट हॅक करण्यात आले असून, त्यावरून पैशाबरोबर इतर वस्तूंचीही मागणी केली जात आहे. आमदार जगताप यांनीच याबाबत ही माहिती दिली असून या अकाउंटवरुन आलेल्या विनंत्यांना प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

हा प्रकार समजताच लगेचच शहर पोलिसांच्या सायबर क्राईम सेलकडे तक्रार करण्यात आली असल्याचे आमदार जगताप यांच स्वीय सहाय्यक सतीश कांबळे यांनी सांगितले. जगताप यांच्या या फॅन फॉलोईंग अकाउंटवरुन १५-२० जणांना पैशाची मागणी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. आमदारांचे अधिकृत फेसबुक अकाउंट हॅक झाले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जगताप यांनीही ट्विट करीत Laxmanjagtap mla हे फेसबुक अकाउंट हॅक झाल्याची माहिती दिली आहे. तसेच, या पेजवरुन आलेल्या रिक्वेस्ट स्वीकारु नयेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

हेही वाचा : महिन्याच्या अखेरीस मुख्यमंत्री बदल! भाजप प्रदेशाध्यक्षांची ऑडिओ क्लिप व्हायरल 

शहरात अशाप्रकारे मान्यवरांची फेसबुक अकाउंट हॅक होण्याचे प्रकार वाढीस लागल्याने सायबर क्राईम सेलची डोकेदुखी वाढली आहे. नुकतेच शिवसेनेचे शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले यांना  हॅकरने असाच दणका दिला होता. तर, शहर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांचा बनावट फेसबुक आयडी वापरून रिक्वेस्ट पाठवल्याचा प्रकार समोर आला होता. तर दुसऱ्या एका पोलीस निरीक्षकाचेही अकाउंट असेच हॅक करण्यात आले होते. त्याआधी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांचेही अकाउंट हॅक झाले होते. सध्या पंतप्रधान कार्यालयात सचिव असलेले पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी आयुक्त श्रीकर परदेशी यांनाही हॅकरने आपला हिसका दाखवला होता.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख