महिन्याच्या अखेरीस राज्यात मुख्यमंत्री बदल! भाजप प्रदेशाध्यक्षांची ऑडिओ क्लिप व्हायरल

येडियुरप्पा यांची या महिन्याच्या अखेरीस मुख्यमंत्रिपदावरुन उचलबांगडी करण्यात येईल, अशी भाजप प्रदेशाध्यक्षांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
karnataka bjp president nalin kumar kateel audio clip goes viral
karnataka bjp president nalin kumar kateel audio clip goes viral

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) भाजपमधील (BJP) अंतर्गत मतभेद दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांना पदावरुन हटवले जावे, अशी पक्षातूनच मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर येडियुरप्पांची या महिन्याच्या अखेरीस मुख्यमंत्रिपदावरुन उचलबांगडी करण्यात येईल, अशी भाजप प्रदेशाध्यक्षांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.  

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटिल यांची 47 सेंकदांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यात कटिल म्हणत आहेत की, राज्यात नक्कीच नेतृत्व बदल होणार आहे. नवीन टीम राज्यात दिसणार आहे. मुख्यमंत्र्यांबाबतचा निर्णय दिल्लीतील नेतृत्वाने घेतला आहे. त्यांना या महिन्याच्या अखेरीस बदलण्यात येईल. 

कटिल यांच्या ऑडिओ क्लिपनंतर मोठा गदारोळ उडाला आहे. कटिल यांनी हा आवाज आपला नसल्याचा दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, त्या ऑडिओतील आवाज माझा नाही, हे मी अनेकवेळा स्पष्ट केले. या प्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे. सत्य बाहेर यायलाच हवे. भूतकाळातही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणी चौकशी व्हावी आणि सत्य बाहेर यावे. 

येडियुरप्पा यांना नुकतेच पक्ष नेतृत्वाने दिल्लीला पाचारण केले होते. त्यांनी पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही येडियुरप्पा यांनी भेट घेतली. या भेटीत येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. यासाठी येडियुरप्पांनी प्रकृतीचे कारण पुढे केले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

पक्षाच्या नेतृत्वाची भेट घेतल्यानंतर येडियुरप्पांना प्रसारमाध्यांनी राजीनाम्याबाबत विचारणा केली होती. यावर त्यांनी कुठला राजीनामा, असा प्रतिप्रश्न माध्यमांना केला होता. ते म्हणाले होते की, मी पंतप्रधानांना भेटलो आहे. राज्यातील विकासकामांबाबत त्यांच्याशी चर्चा झाली आहे. मी पुन्हा ऑगस्टमध्ये दिल्लीत परत येणार आहे. राजीनाम्याचा बातम्यांना अजिबात महत्व नाही. राज्यातील नेतृत्व बदलाबाबत कोणताही चर्चा झालेली नाही. मला कुणीही राजीनामा देण्यास सांगितलेले नाही.  

उत्तराखंडचे तत्कालीन मुख्यमंत्री तिरथसिंह रावत यांना असेच अचानक दिल्लीत बोलावण्यात आले होते. नंतर त्यांनी राज्यात परत जाऊन थेट राज्यपालांकडे राजीनामा सोपवला होता. त्यानंतर पुष्करसिंह धामी उत्तराखंडचे नवीन मुख्यमंत्री बनले होते. त्यामुळे कर्नाटकमध्ये उत्तराखंडची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. परंतु, पक्ष नेतृत्वाने अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे सूत्रांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com