आता वेळ बदलणार! भाजप नगरसेवकाच्या फ्लेक्सवर फक्त राष्ट्रवादीचेच नेते

नगरसेवक रवी लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात लागलेल्या होर्डिंग्जवरून भाजप नेते गायब झाले आहेत.
आता वेळ बदलणार! भाजप नगरसेवकाच्या फ्लेक्सवर फक्त राष्ट्रवादीचेच नेते
bjp leaders missing from corporator ravi landge birthday flex

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpari-Chinchwad) भाजप (BJP) रुजवून ती वाढविणारे पक्षाचे दिवगंत शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांचे पुतणे आणि २०१७ ला बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक रवी लांडगे (Ravi Landge) यांच्या वाढदिवसानिमित्त (ता.१५) शहरात लागलेल्या होर्डिंग्जवरून भाजप नेते गायब झाले आहेत. त्याजागी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्यांच्या छबी झळकल्याने शहरात तो चर्चेचा विषय झाला आहे. या फ्लेक्सवरील आता वेळ बदलणार असा सूचक इशाराही लक्ष वेधून घेत आहे.

दरम्यान, भाजपचेच भोसरीतील दुसरे नगरसेवक संजय नेवाळे यांचाही गुरुवारी (ता.१२) वाढदिवस झाला. त्यानिमित्त राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि भोसरीचे माजी आमदार यांनी त्यांचा खास सत्कार केल्याने त्याचीही चर्चा झाली. कारण त्यावेळी रवी लांडगे आणि भोसरीतील आणखी एका भाजप नगरसेविकेचे पती उपस्थित होते. एकूणच महापालिका निवडणूकजवळ आल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये व त्यातही भोसरीत बदलाचे वारे वाहू लागले आहे. त्याला वरील दोन वाढदिवसांनी दुजोरा मिळाला आहे. 

या दोन्ही नगरसेवकांच्या जोडीने भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातीलही काही भाजपचे नगरसेवक नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातील काहींना पदे मिळालेली नाहीत. त्यामुळे गतवेळी २०१७ ला राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले काहीजण पुन्हा घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. त्यांची पदाची मुदत संपता-संपता निवडणूक जाहीर होताच हे इनकमिंग राष्ट्रवादीत होईल, असे त्यांच्या एका नेत्याने सांगितले. तर,या भोसरीतील नाराजांना एकत्र आणण्याचे काम लांडे यांनी सुरु केले आहे. भोसरीतील वीस नगरसेवकांना पुन्हा स्वगृही आणण्याचा दावा त्यांनी केला आहे.

रवी लांडगे यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद न मिळाल्याने ते पक्षावर नाराज आहेत. दुसरीकडे त्यांचे बंधू अमित यांना राष्ट्रवादी युवकचे भोसरी विधानसभा मतदारसंघ अध्यक्षपद देण्यात आले आहे. त्यातूनही त्यांचे भाजपमधून बाहेर पडून राष्ट्रवादीत जाण्याचे संकेत मिळाले आहेत. वर्षअखेरीस हा प्रवेश होईल, असे त्यांच्या निकटच्या वर्तुळातून सांगण्यात आले. त्याची चुणूक त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात लागलेल्या फ्लेक्सवरूनही दिसून येत आहे. त्यावर भाजप नेत्यांऐवजी शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, खा.डॉ. अमोल कोल्हे, विलास लांडे यांच्याजोडीने पार्थ पवार या राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो झळकल्याची सध्या चर्चा सुरु आहे. भाजपच्या कार्यालयाजवळही हे होर्डिंग्ज लावण्यात आले आहे.

भोसरीचे आमदार भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे आहेत.तर, चिंचवडमध्ये भाजपचे माजी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप हे आमदार आहेत. भोसरीच्या जोडीने तेथेही बदलाचे वारे वाहू लागले आहेत. तेथीलही काही नाराज नगरसेवक भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. एका नगरसेविकेने, तर पक्षाच्या कार्यक्रमांना जाणेही बंद केले आहे. त्यामुळे पक्षातले पहिले आऊटगोईंग हे भोसरीतून की चिंचवडमधून होणार याकडे शहराचे व राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

दरम्यान,भाजपमधील या आऊटगोईंगवर पालिकेत पुन्हा सत्ता येईल,हे राष्ट्रवादीचे शहरातील काही नेते स्वप्न पाहत आहेत. मात्र,ते फक्त यामुळे साकार होईल,अशी सद्य:स्थिती नाही. शहरातील पक्षातील सर्व गटतट, नेते एकत्र आले व त्यांनी सत्ताधारी भाजपच्या आरोप झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराविरुद्ध आवाज उठवला,तरच त्यांचे सत्तेचे स्वप्न साकार होण्यास हातभार लागणार आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in