चिमुरडीसमोरच तिच्या पित्याला मारहाण करुन धिंड काढणारे 24 तासांत जामिनावर बाहेर

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण करत त्याची धिंड काढली होती.
police arrest 3 persons over beating muslim man in uttar pradesh
police arrest 3 persons over beating muslim man in uttar pradesh

लखनऊ : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूरमध्ये (Kanpur) बजरंग दलाच्या  (Bajrang Dal) कार्यकर्त्यांनी एका मुस्लिम (Muslim) व्यक्तीला  मारहाण करत त्याची धिंड काढली होती. तसेच, त्याला 'जय श्रीराम'च्या घोषणा द्यायला लावल्याची घटना समोर आली होती. यावेळी त्या व्यक्तीची मुलगी वडिलांना वाचवण्यासाठी बिलगली होती. ती रडतच वडिलांना न मारण्याची विनंती करत राहिली पण त्यानंतरही तरूणाची धिंड थांबली नव्हती. अखेर पोलिसांनी या प्रकरणी तिघांनी अटक केली पण ते 24 तासांतच जामिनावर सुटले आहेत. 

या प्रकरणी मोठा गदारोळ झाल्यानंतर पोलिसांनी तीन आरोपींनी अटक केली होती. परंतु, त्यांच्यावर लावण्यात आलेली कलमे गंभीर नसल्याने पोलीस ठाण्यातूनच त्यांना जामीन देण्यात आला. याबद्दल बोलताना कानपूरच पोलीस आयुक्त असिम अरुण म्हणाले की, आम्ही या प्रकरणातील तीन मुख्य आरोपींनी अटक केली आहे. या प्रकरणी आणखी आरोपींनी अटक केली जाणार आहे. याचबरोबर ही घटना घडली त्या परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी योग्य ती पावले उचलली जात आहेत. 

कानपुरातील एका वस्तीमध्ये कुरैशा आणि राणी यांचे कुटूंब एकमेकांच्या शेजारी राहते. या दोन कुटुंबांमध्ये वाद झाला होता. यातून कुरैशा यांनी राणी यांच्यावर मारहाणीचा आरोप करत पोलिसांत तक्रार केली. तर राणी यांनी कुरैशा यांच्या मुलांवर छेडछाडीचा आरोप केला. या प्रकरणात नंतर बजरंग दलाने उडी घेत बुधवारी कुरैशाच्या घरावर हल्ला केला. ते कुरैशा यांच्या मुलांना पकडण्यासाठी गेले होते. पण मुलं न सापडल्याने त्यांनी कुरैशा यांच्या अफसार या दिराला पकडत मारहाण सुरू केली. त्यांची रस्त्यावरून धिंड काढली. यावेळी त्यांची मुलगी त्यांच्याजवळच होती. वडिलांना मारहाण होत असताना ती त्यांच्या पायाला बिलगून होती. मारहाण न करण्याची विनंती ती करत होती. पण त्यानंतरही मारहाण थांबली नाही. 

दरम्यान, या प्रकारपूर्वी बजरंग दलाने तिथे एक सभाही घेतली होती. सभेमध्ये कानपूर बजरंग दलाचे जिल्हा संयोजक दिलीप सिंह म्हणाले होते की, आम्ही हिंदू समाजाचे नुकसान होऊ देणार नाही. आमच्या सनातन धर्माला वाचवण्यासाठी आम्ही स्वत: सक्षम आहोत. आमच्या हिंदू कुटूंबाला जर त्रास होत असेल तर आम्ही ढाल बनून उभे राहू, असा इशाराही दिलीप सिंह यांनी दिला होता. 

अफसार यांची धिंड काढत असताना पोलिस त्याठिकाणी आले व त्यांची सुटका केली. त्यांनी काही जणांविरोधात पोलिसांत तक्रार दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कानपूर दक्षिणचे सहाय्यक पोलिस आयुक्त रवीना त्यागी म्हणाल्या, पीडिताच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करून काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये काही अज्ञात व्यक्तीही आहेत. या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com