`राष्ट्रवादी'कडून उच्च विद्याविभूषित फौजिया खान यांचा बहुमान

राष्ट्रवादी कॉग्रेस महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा माजी राज्यमंत्री फौजिया खान यांना पक्षाच्यावतीने राज्यसभेवर संधी देण्यात आली आहे. पक्षाच्यावतीने त्यांना हा बहुमान देण्यात आला असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात होत आहे.
ncp nominates fauzia khan to RS
ncp nominates fauzia khan to RS

परभणी : राष्ट्रवादी कॉग्रेस महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा माजी राज्यमंत्री फौजिया खान यांना पक्षाच्यावतीने राज्यसभेवर संधी देण्यात आली आहे. पक्षाच्यावतीने त्यांना हा बहुमान देण्यात आला असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात होत आहे. उच्च विद्याविभुषित व पक्षाचा एक सुशिक्षित चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

आघाडी शासनाच्या काळात 2008 ते 2014 दरम्यान राज्यमंत्री राहिलेल्या फौजिया खान या काही काळ परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री देखील राहिलेल्या आहेत. फौजिया खान यांच्या राजकीय वाटचालीची सुरुवात ही परभणी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीपासून झालेली आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुक ही थेट जनतेतून घेण्यात आली होती. त्यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

राजकारणात येण्याआधी त्या शिक्षिकी पेशात होत्या. त्यांच्यातील नेतृत्व गुण व त्यांचे शिक्षण पाहून राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना थेट विधान परिषदेवर संधी दिली. उत्तम वक्तृत्वगुण असलेल्या फौजिया खान यांनी त्यांच्या कार्यकौशल्यातून अल्पावधीतच पक्षात आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्यातील पक्षकार्याची चुणुक ओळखून शरद पवार यांच्या शिफारशीने त्यांना 2008 मध्ये विधानपरिषदेसाठी नियुक्त करण्यात आले. याच आघाडी सरकारच्या काळात त्यांची राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली. त्यांच्याकडे शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण, सांस्कृतिक कार्य, सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क आणि अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी देण्यात आली. त्यांची मंत्रीमंडळात निवड झाल्यानंतर त्या राज्यातील मुस्लिम समाजातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. ज्यांची राज्यमंत्री मंडळात नियुक्ती करण्यात आली होती. 

सलग दोन वेळा त्यांची विधान परिषदेवर राज्यपालांकडून नियुक्ती झाली. परंतू 2014 मध्ये राज्यात सत्तातंर झाले. त्यानंतर फौजिया खान यांना पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची मोठी जबबादारी शरद पवार यांनी दिली. आज महिलांचे संघटन राज्यभरात मजबूत करत त्या पक्षाचे काम करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देऊ केली आहे. पक्षाने त्यांच्या निष्ठापूर्वक केलेल्या कामाची पावती म्हणून त्याचा बहुमान केल्याचे बोलले जात आहे.

पती तहसिन खान खरे पाठीराखे
शिक्षकी पेशात असणाऱ्या फौजिया खान यांचे पती वनाधिकारी आहेत. फौजिया खान यांच्या राजकीय प्रवासात पती तहसिन खान यांचे मोठे योगदान व पाठींबा दिसून येतो. दोन वेळा विधान परिषदेच्या आमदार, राज्यमंत्री आणि त्यानंतर राष्ट्रवादी कॉग्रेस महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा अशा मोठ्या पदाची जबबादारी यशस्वीपणे पेलणाऱ्या फौजिया खान यांच्या या राजकीय प्रवासात त्यांचे पती तहसीन खान हेच खऱ्या अर्थाने पाठीराखे म्हणावे लागतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com