... तर तुळजाभवानीचे आशीर्वाद घ्यायला तुळजापूरला रेल्वेने येता आले असते - ओमराजे निंबाळकर

तुळजापूर रेल्वे मार्गाचे काम अपेक्षेप्रमाणे पुर्ण झाले असते तर रेल्वे राज्यमंत्र्यांना तुळजा भवानीचे आशीर्वाद घ्यायला रेल्वेने येता आले असते असा चिमटा उस्मानाबादचे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी काढला.
 railway minister for state could have come to tuljapur by railway says omraje nimbalkar
railway minister for state could have come to tuljapur by railway says omraje nimbalkar

औरंगाबादः रेल्वे राज्यमंत्री उद्या तुळजा भवानीचे आशीर्वाद घ्यायला तुळजापूरात येणार आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मागणीवरून २०१४ मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुळजापूर रेल्वे मार्गाला मंजुरी दिली होती. पण त्यानंतर या रेल्वे मार्गाचे काम अपेक्षेप्रमाणे झाले नाही. आज तुळजापूर रेल्वे मार्गाचे काम पुर्ण झाले असते तर रेल्वे राज्यमंत्र्यांना तुळजा भवानीचे आशीर्वाद घ्यायला रेल्वेने येता आले असते असा चिमटा उस्मानाबादचे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी काढला.

रेल्वे अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होतांना ओमराजे निंबाळकर यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील रेल्वे प्रश्नांना वाचा फोडली. रेल्वे राज्यमंत्र्यांचा नियोजित तुळजापूर दौरा पाहता निंबाळकर यांनी तुळजापूर रेल्वे मार्गाचा विषय प्रामुख्याने सभागृहात मांडला. 

ओमराजे निंबाळकर म्हणाले, तुळजापूर हे नावजलेले तीर्थक्षेत्र आहे. दर महिन्याला लाख दीड लाख भाविक इथे दर्शनासाठी येत असतात. दसऱ्याच्या वेळी ही संख्या सतरा ते अठरा लांखावर जाते, केवळ महाराष्ट्रच नाही, तर कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यातून देखील मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या रेल्वे मार्गाचे काम तातडीने सुरू करणे गरजेचे आहे. 

खासदार म्हणून दर महिन्याला रेल्वे, महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मी वारंवार या मार्गासाठी पाठपुरावा करतोय. पण आमची अवस्था आगीतून निघालो आणि फुपाट्यात टाकल्या सारख झालयं. पुणे विभागाकडे असलेले हे काम भुसावळ विभागाकडे देण्यात आले आहे. सतरा तासांचा प्रवास करून भुसावळचा अधिकारी इथे येऊ शकत नाही. त्यामुळे हे काम पुर्वीप्रमाणेच पुणे विभागाकडे सोपवून या प्रकल्पासाठी एक स्वतंत्र नोडल आॅफिसर नेमावा, अशी मागणी त्यांनी केली.

या शिवाय उस्मनाबाद मतदारसंघातील विस्थापित झालेल्या आणि मुंबई, पुणे येथे स्थायिक झालेल्या लोकांसाठी पुणे-लातूर-उस्मानाबाद ही इंटरसिटी रेल्वे सुरू करावी ही आमची मागणी आहे. ढोकी, कळंबरोड स्टेशनला एक्स्प्रेस गाड्यांना थांबा द्यावा ही देखील मागणी आम्ही गेल्या अनेक वर्षापासून करतोय त्यावर देखील निर्णय घेतला गेला पाहिजे अशी आग्रही मागणी ओमराजे निंबाळकर यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com