कोरोना कहर संपला : हितेंद्र ठाकूर यांच्याविरोधात मोर्चेबांधणी सुरू.... - Corona havoc over: Front formation against Hitendra Thakur begins .... | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

कोरोना कहर संपला : हितेंद्र ठाकूर यांच्याविरोधात मोर्चेबांधणी सुरू....

संदीप पंडित
सोमवार, 23 ऑगस्ट 2021

शिवसेना राज्यात सत्तेवर असल्याचा पुरेपूर फायदा उठवत साम, दाम, दंड या त्रिसूत्रीचा वापर महापालिका निवडणुकीत करणार असल्याचे प्रशासकीय राजवटीतील वाटचालीवरून दिसत आहे. 

विरार : वसई-विरार शहर महापालिकेची मुदत 28 जून 2020 रोजीच संपली आहे. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पालिकेची निवडणूक दोन वेळा पुढे ढळण्यात आली आहे. निवडणुकीचा नारळ काही फुटत नसल्याने ही निवडणुक कधी होईल? याकडे गुडघ्याला नगरसेवकपदाचे बाशिंग बांधलेल्या हौसे नवशे गवश्यांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र, वर्षभरापासून रखडलेली वसई-विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक आता कोरोनाचा कहर ओसरू लागल्याने यावर्षी नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे. 

ही निवडणूक लवकरात लवकर घेण्याची तयारी राज्य शासन करत असल्याचे समजते कारण फेब्रुवारीमध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता असल्याने त्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित करता यावे, यासाठी त्या अगोदर ह्या निवडणुका घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्याचे समजते. वसई-विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीवर कोरोना आपत्तीबरोबरच 29 गावांच्या सुनावणीचे आणि आता ओबीसींचे रद्द केलेले राजकीय आरक्षण या पार्शभूमीवर  निवडणुकीची उत्सुकता ताणली गेली आहे.  

हेही वाचा : कुत्री भुंकतातच्या वक्तव्यावरून इंदुरीकर महाराजांवर चित्रा वाघ भडकल्या!

महापालिकेची मुदत संपूण बराच काळ लोटला. या काळात काही निवडणुका झाल्यानंतरदेखील वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीला मंत्रालयातून खो दिला जात असल्याची टीकाही जोरात सुरु आहे. यावेळी महापालिकेच्या निवडणुकीला खर्‍या अर्थानं रंग चढणार  आहे. बहुजन विकास आघाडीच्या आमदार हितेंद्र ठाकूर यांना शह देण्यासाठी शिवसेनेना बड्या नेत्यांची फौजच मैदानात उतरवणार आहे.

आवश्य वाचा : तालिबानला मोठा धक्का! 300 दहशतवाद्यांचा अफगाणी सैन्याकडून खातमा

तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्याने या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रित निवडणुकीला जाण्याचे आघाडीचे मनसुभे उधळले गेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी बविआ विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि मनसे असा सामना रंगणार असल्याचे चित्र आता तरी दिसत आहे. मात्र, गत निवडणुकांचा इतिहास लक्षात घेता त्यांना फारसे यश प्राप्त झालेले नाही.

यावेळी शिवसेना राज्यात सत्तेवर असल्याचा पुरेपूर फायदा उठवत साम, दाम, दंड या त्रिसूत्रीचा वापर महापालिका निवडणुकीत करणार असल्याचे प्रशासकीय राजवटीतील वाटचालीवरून दिसत आहे. असे असले तरी बविआ, शिवसेना आघाडीच्या कारस्थानांना भिक घालणार नसल्याचे, काही महिन्यापूर्वी झालेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकीवरून दिसते.

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत बविआ-भाजपच्या सहकार पॅनलविरोधात शिवसेनेने महाविकास आघाडीच्या माध्यमातून मोट बांधून वर्चस्वाचा प्रत्यत्न केला. मात्र, शिवसेनेचे हे परिवर्तन पॅनल सपशेल तोंडावर आपटले होते. त्यांना अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळेच आघाडी सरकारने बविआचा धसका घेऊन वसई विरार पालिकेची निवडणूक या - ना त्या मार्गाने पुढे ढकलून प्रशासका  मार्फत वर्चस्व राखणे सुरु ठेवले असल्याचीही चर्चा वसईमध्ये चांगलीच रंगत आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख