गुलाबराव पाटलांनी शब्द पाळला; जळगावात विसावी नगरपरिषद आली अस्तित्वात - Twentieth Municipal Council came into existence in Jalgaon district today | Politics Marathi News - Sarkarnama

गुलाबराव पाटलांनी शब्द पाळला; जळगावात विसावी नगरपरिषद आली अस्तित्वात

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 30 जून 2021

जळगाव जिल्ह्यातील ही विसावी नगरपरिषद ठरली आहे.

जळगाव : जळगाव (Jalgaon) तालुक्यातील नशिराबाद येथे नगरपरिषद अस्तित्वात आली असून आज शासनाकडून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील ही विसावी नगरपरिषद ठरली आहे. जून महिना अखेरपर्यंत नगरपरिषद अस्तित्वात आणू असा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेला शब्द पाळला आहे. निवडणूक होईपर्यंत जळगावचे तहसीलदार नामदेव पाटील यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (Twentieth Municipal Council came into existence in Jalgaon district today)

नशिराबाद हे जळगाव तालुक्यातील सर्वात मोठे शहर आहे. काही वर्षांपूर्वी या शहरात खूप मोठी बाजारपेठ होती. त्याकाळी नशिराबादला जळगावपेक्षा अधिक महत्व होते. काळाच्या ओघात जळगाव प्रगतीत खूप पुढे निघून गेले तरी नशिराबाद हे खूप मोठे व महत्वाचे शहर मानले जाते. या शहरात आजवर १७ सदस्यांची मोठी ग्रामपंचायत कार्यरत होती. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात येथे नगरपरिषदेच्या निर्मितीसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे वचन दिले होते. या अनुषंगाने त्यांनी प्रयत्न सुरू केले. 

हेही वाचा : जळगावात एकनाथ खडसे भाजपला पुन्हा धक्का देणार

कोविडमुळे यात काही महिने विलंब झाला. मात्र गत वर्षाच्या अखेरीस नगरपरिषदेची प्रक्रिया सुरू झाली. दरम्यान, ग्रामपंचायतीची निवडणूक आली. लवकरच नगरपरिषद होणार असल्याने गावकर्‍यांनी अभूतपुर्व एकी दाखवत या निवडणुकीत भागच घेतला नाही. येथे फक्त एक सदस्य बिनविरोध निवडून आल्याने प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती.

दरम्यानच्या काळात नशिराबाद नगरपरिषदेसाठीची तयारी जोराने सुरू होती. यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेमार्फत स्वतंत्र प्रस्ताव पाठविण्यात आले होते. नगरपरिषदेसाठी स्थानिक नागरिकांच्या हरकती मागविण्यात आल्या होत्या. यात एकानेच घेतलेल्या आक्षेपालाही प्रशासनाने समाधानकारक निराकरण केले. यातच काही दिवसांपूर्वी गुलाबराव पाटील यांनी जून महिन्याच्या अखेरीस नगरपरिषद होणार असल्याचे सूतोवाच केले होते. या अनुषंगाने आज नशिराबाद नगरपरिषदेची अधिसूचना निघाली आहे.

अधिसूचना जारी झाल्यानंतर पाटील म्हणाले, नशिराबादकरांना नगरपरिषदेचा दिलेला शब्द पाळला आहे. या शहराच्या विकासासाठी आम्ही कटीबध्द आहोत. आगामी निवडणुकीत शहरवासी आम्हाला कौल देतील हा पूर्ण विश्‍वास आहे. आजचा दिवस हा नशिराबादच्या इतिहासातील सोन्याचा दिवस असून आम्ही याचे स्वागत करत आहोत. नगरपरिषद झाल्यामुळे नगरविकास खात्याच्या रस्ते व पायाभूत सुविधांच्या सर्व योजना या शहरासाठी मंजूर करण्यात येणार आहेत. यामुळे नशिराबादला नवीन वैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचेही  पाटील यांनी नमूद केले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख