‘ओबीसीं'मध्ये अपप्रचार करणाऱ्यांना शोधून त्यांना जाब विचारायला हवा! - ncp mla rohit pawar slams politicians who are spreading misinformation | Politics Marathi News - Sarkarnama

‘ओबीसीं'मध्ये अपप्रचार करणाऱ्यांना शोधून त्यांना जाब विचारायला हवा!

कैलास शिंदे
रविवार, 24 जानेवारी 2021

मराठा आरक्षणाची मागणी करताना दुसऱ्या समाजाच्या समाजातून आम्हाला हक्क पाहिजे, असे कोणीही बोलत नाही. 

जळगाव : मराठा आरक्षणाची मागणी करताना दुसऱ्या समाजाच्या समाजातून आम्हाला हक्क पाहिजे, असे कोणीही बोलत नाही. मात्र, काही जण ओबीसी समाजात वेगळ्या प्रकारचा अपप्रचार करून तेढ निर्माण करीत आहेत. अशा लोकांना शोधून जाब विचारायला हवा, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मांडली. 

आमदार रोहित पवार आज जळगाव दौऱ्यावर होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मराठा आरक्षणप्रश्‍नी खंडपीठात जी सुनावणी सुरू आहे, ती ऑनलाईन पध्दतीने न होता, समोरासमोर व्हावी अशी विनंती राज्य सरकारने न्यायालयाकडे केली आहे. राज्य सरकारची विनंती न्यायालय मान्य करेल असा विश्‍वास मला वाटतो.

गर्दीत हरवले आमदार रोहित पवार...कार्यकर्त्यांनी साखळी करुन काढलं बाहेर

ओबीसीमध्ये आरक्षणप्रश्‍नी आक्रमकता वाढत आहे. या प्रश्‍नाला उत्तर देताना आमदार पवार म्हणाले की, आम्हाला दुसऱ्या समाजातून आरक्षण पाहिजे असे कोणीही बोललेले नाही, मात्र ओबीसी समाजामध्ये काही लोक अपप्रचार करीत असतील तर अशा लोकांना शोधले पाहिजे. ते असे का करीत आहेत, हे त्यांना विचारले पाहिजे. आपल्या देशात सर्व समाजाचे लोक एकत्रितपणे राहत आहेत. परंतु, अशा प्रकारे जर कुणी अपप्रचार करून समाजात तेढ निर्माण करीत असेल तर ती अत्यंत वाईट गोष्ट आहे.

शेतकऱ्यांना विश्‍वासात घेतले नाही
दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना पवार म्हणाले की, केंद्र सरकारने  कायदा मंजूर केला, मात्र तो समितीकडे पाठवायला पाहिजे होता. त्या ठिकाणी सर्व पक्षाचे सदस्य असतांना परंतु त्यांनीही तेही केले नाही. केंद्राने शेतकऱ्यांना आणि जनतेला विश्‍वासात घेतले नाही, त्यामुळेच केंद्र सरकार विरोधात त्यांचा हा उद्रेक आपण पाहत आहोत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख