नंदुरबारचे जिल्हाधिकारी IAS राजेंद्र भारूड हे तेथूनच लोकसभा निवडणूक लढविणार? - Nandurbar Collector IAS Rajendra Bharud clarifies about joining politics | Politics Marathi News - Sarkarnama

नंदुरबारचे जिल्हाधिकारी IAS राजेंद्र भारूड हे तेथूनच लोकसभा निवडणूक लढविणार?

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 8 मे 2021

काही विशिष्ट लोकप्रतिनिधींचे भारूडांवर सातत्याने आरोप...  

पुणे : नंदुरबारचे जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भारूड (IAS Rajendra Bharud) आणि तेथील खासदार डाॅ. हिना गावित (MP Heena Gavit) यांच्यातील वाद राज्यात गेल्या आठवड्यात जोरदार गाजला. भाजपच्या खासदार असलेल्या गावित यांनी भारूड यांच्यावर टिकेची झोड उठवली. (MP Heena Gavit criticizes collector Rajendra Bharud) रेमडिसिव्हिर इंजेक्शनच्या वाटपात काळाबाजार झाल्याच्या टिकेतून या वाादाची ठिणगी पेटली. आदिवासी समाजाचेच असलेले भारूड हे आदिवासी समाजाच्याच खासदाराचे लक्ष्य का झाले, यावरून आता वेगळीच चर्चा रंगू लागली आहे.

भारूड हे नंदुरबारचे आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षणही तेथेच झाले. तसेच ते लोकप्रिय देखील झाले आहेत. त्यातून ते आगामी काळात राजकारणात उतरणार असल्याचे चर्चा साहजिकपणे सुरू झाली. नंदुरबार (Namndurbar) हा अनुसूचित जमातींसाठी राखीव लोकसभा मतदारसंघ आहे. त्यामुळे गावित यांना आपले संभाव्य प्रतिस्पर्धी समजून तर त्यांच्यावर वेगवेगळे आरोप केले तर नाहीत ना, अशी शंका व्यक्त होऊ लागली. खुद्द भारूड यांनाही हेच कारण वाटत आहे आणि यातूनच आपल्याला आऱोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात असल्याचा संशय व्यक्त केला. त्यावर त्यांनीच स्पष्टपणे खुलासा केला आहे. राजकारणाशी माझा दुरूनही संबंध नसल्याचे सांगत अशा शंकेतून माझ्यावर आरोप होणे चुकीचे असल्याचे मत सोशल मिडियात मांडले. त्यांनी गावित यांचे नाव घेतले नाही. पण त्यांचा इशारा कोणाकडे आहे, हे उघड होते.

आदिवासी समाजातील मी आयएएस अधिकारी झालो तेव्हा जिल्ह्यातील अनेक जणांनी, नेत्यांनी फोन करून माझे अभिनंदन केले. मात्र जिल्ह्यातील एक कुटुंबाने माझे अभिनंदन केले नाही. एक आपल्याचा समाजाचा मुलगा पुढे गेला, याचे कौतुक त्यांना नव्हते, असा टोलाही त्यांनी गावित यांचे नाव न घेता लगावला.

खासदार गावित यांनी केेलेल्या आरोपांनी त्यांनी अर्ध्या तासाच्या व्हिडीओद्वारे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. माझ्यावर एवढे आऱोप करण्यापेक्षा लोकांच्या सेवेसाठी तेवढा वेळ दिला असता तर लोकांना दिलासा मिळाला असता, असा टोलाही त्यांनी लगावला. 

नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या महिन्याभरापासून काही लोकप्रतिनिधींनी Remdesivir वाटपाबद्दल विविध आरोप केले, खरे तर त्यांना शासनाकडे तक्रार करण्याचा अधिकार होता आणि शासनाकडे आम्ही त्याचे उत्तर दिलं असतं. परंतु लोकांसमोर आणि प्रसार माध्यमांसमोर वारंवार जाऊन चुकीच्या पद्धतीने विषय मांडल्या गेल्या.  काही लोकांनी याबाबत माझी बाजू मांडण्याती आणि उत्तर देण्याची विनंती केली. या आरोपांना पुराव्यांनिशी उत्तर त्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे दिले. रेल्वेच्या कोचमध्ये कोविड सेंटर सुरू केल्याचे श्रेय आपण घेतल्याच्या आरोपातही तथ्य नसल्याचे त्यांनी मांडले. ही रेल्वे माझ्या पत्रामुळे आले की नाही, हा महत्वाचा मुद्दा नाही. मी आज या जिल्ह्यात आहे पण उद्या नसेल, त्यामुळे मला श्रेयाची गरज नाही. मी लोकांसाठी काम करतो आहे.  जिल्ह्यात आऱोग्य व्यवस्था कशी नाही, हे पण त्यांनी यानिमित्ताने सांगितले आणि जिल्ह्याचे राजकीय नेतृत्व असलेले गावित यांनी याकडे कसे लक्ष दिले नाही, हे अप्रत्यक्षिरित्या सांगितले. आरोग्य क्षेत्रासाठी गेल्या पाच-सहा महिन्यांत आफण कसे काम केले याचा आढावा त्यांनी घेतला.  

इतर अजूनही काही अफवा सध्या पसरविण्यात येत आहेत आणि भविष्यात सुद्धा पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. नकारात्मक विचारापासून दूर राहावं आणि जेवढे चांगले करता येईल तेवढे करण्यासाठी आपण सर्व एकत्र येऊन प्रयत्न करू या. खरंतर कोरोना विरुद्ध लढण्यासाठी आम्हाला सर्वांची मदतीची गरज आहे. ती आपण देतच आहात. असेच सोबत राहा , सर्वांनी एकत्र येऊन लढा देऊ या, असे आवाहन त्यांनी केले. मनाचा कोतेपणा दाखवू नये. जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. माझ्याविरोधात वारंवार आरोप, खोट्या तक्रारी करून लोकांत घबराट पसरवू नये. लसीकरणासाठी गावोगावी फिरून जागृती आम्ही करत आहोत. त्यासाठी सर्वांनी सहकार्य द्यावे. या विषयावर मी पुन्हा बोलणार नाही. खुलासा करणार नाही. कोरोनाच्या लढाईवह लक्ष केंद्रीत करू, असे व्हिडीओच्या  शेवटी त्यांनी सांगितले.

ही पण बातमी वाचा : राज्य सरकार नवा मागासवर्गीय आयोग नेमणार

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख