नागपुरात ज्येष्ठांसाठी ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’ सेवा सुरू झाल्याचे समाधान : डॉ. नितीन राऊत 

गरज नसेल तर घराबाहेर निघूच नये. लसीकरण पूर्ण होईपर्यंत घराबाहेर पडणे आपल्या सोबत इतरांना धोक्यात घालण्यासारखे आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी लसी उपलब्ध होणे आवश्यक असून शंभर टक्के लसीकरण हे सध्या एकमेव उद्दिष्ट आहे.
Nitin Raut
Nitin Raut

नागपूर : ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत (Guardian Minister DR. Nitin Raut) यांच्या सूचनेनुसार मुंबई पाठोपाठ नागपूर येथेही नागपूर महानगरपालिकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशनला (Drive in vaccination for senior citizens) सुरुवात केली. पालिकेने केलेल्या कामाच मनस्वी आनंद झाला असल्याचे पालकमंत्री डॉ. राऊत यांनी आज येथे सांगितले. बेडची उपलब्धता, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड आदींची व्यवस्था करण्यात महाराष्ट्रात सर्वाधिक सुविधा उपलब्ध करणारा नागपूर जिल्हा (Nagpur District) या उपक्रमातही अग्रेसर आहे. महानगरपालिकेने पुढाकार घेऊन ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन मोहीम सुरू केल्याबद्दल त्यांनी पालिका प्रशासनाचे कौतुक केले.

आज नागपूर शहरातील वैद्यनाथ चौक येथील ट्रीलीयन मॉलमध्ये त्यांनी साठ वर्षांवरील ज्येष्ठांच्या ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन मोहिमेची सुरुवात केली. यावेळी त्यांनी वाहनात आलेल्या श्यामदास छाबराणी (८३ वर्ष), कृष्णा छाबराणी (६२ वर्ष) या ज्येष्ठांचे लसीकरण केल्यानंतर गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. छाबराणी परिवाराशी त्यांनी संवाद साधला. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, आमदार अभिजित वंजारी, महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी, स्थायी समितीचे सभापती प्रकाश भोयर, मनपा विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, धंतोली विभागाच्या सभापती वंदना भगत, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, साहाय्यक आयुक्त किरण बगडे, यांच्यासह अन्य पदाधिकारी व आरोग्य अधिकारी संजय चिलकर यांच्या नेतृत्वातील आरोग्य पथक उपस्थित होते. 

आज सकाळी ग्लोबल स्क्वेअर मॉल या ठिकाणी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’चे उद्घाटन झाले. त्यानंतर दिवसभरात हा अशा पद्धतीच्या लसीकरणाचा दुसरा कार्यक्रम आहे. नागपूर शहरातील ज्या नागरिकांना स्वतः एकटे येणे शक्य नाही, जे ज्येष्ठ नागरिक अंथरुणाला खिळून आहेत किंवा अन्य आजारांनी ग्रस्त आहेत. ज्यांना कोणाच्या तरी मदतीची गरज आहे. अशा 60 वर्षांवरील नागरिकांना त्यांच्या नातेवाइकांनी किंवा ओळखीच्या व्यक्तीने स्वतःच्या वाहनांमध्ये याठिकाणी आणल्यास वाहनात बसून असतानाच त्यांचे महानगरपालिकेच्या वैद्यकीय पथकाकडून लसीकरण केले जाते.

या ठिकाणी स्वतःच्या वाहनाशिवाय ऑटोमध्ये देखील ज्येष्ठ नागरिकांना आणले जाऊ शकते. जे ज्येष्ठ नागरिक स्वतःचे वाहन, दुचाकी चालवू शकतात, त्यांना देखील या ठिकाणी सुविधा दिली जाणार आहे. तथापि ही सुविधा केवळ 60 वर्षावरील असाह्य ज्येष्ठ नागरिकांसाठी असून नागपुरातील तरुणाईने यासाठी आपल्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना याठिकाणी पोहोचवून त्यांचे लसीकरण करून घेण्यासाठी मदत करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

पालकमंत्र्यांनी यावेळी काही नागरिकांचे लसीकरण होईपर्यंत वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रशासन तिसऱ्या लाटेसाठी सज्ज होत असल्याचे स्पष्ट केले. सध्या नागपूर शहरांमध्ये बेड, ऑक्सिजन, रेमडेसिव्हिर इंजेक्शन व अन्य औषधसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. जिल्ह्यामध्ये कोरोना विरुद्धची लढाई सर्व मिळून सर्वांच्या सहकार्याने लढली जात आहे. पुढील काळातील नियोजनासाठी प्रयत्न केले जात असून दर चार तासांनी प्रत्येक बाबीचा आढावा घेतला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढील काळात ही लाट नियंत्रित करण्यासाठी कडक निर्बंधाचे पालन करावे. 

गरज नसेल तर घराबाहेर निघूच नये. लसीकरण पूर्ण होईपर्यंत घराबाहेर पडणे आपल्या सोबत इतरांना धोक्यात घालण्यासारखे आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी लसी उपलब्ध होणे आवश्यक असून शंभर टक्के लसीकरण हे सध्या एकमेव उद्दिष्ट आहे. नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे, नागपूर शहरातील तरुणांनी या दोन केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी आणण्यात मदत करावी, स्वयंसेवी संस्थांनी मदत करावी, असेही आवाहन डॉ.राऊत यांनी केले.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com