मागणी आमदार कांबळेंच्या अटकेची, अन् गुन्हा दाखल झाला खासदार तडसांवर... - demand for arrest of mla kamble and case registered against mp tadas | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

मागणी आमदार कांबळेंच्या अटकेची, अन् गुन्हा दाखल झाला खासदार तडसांवर...

भूपेश बारंगे
शुक्रवार, 14 मे 2021

मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेतात. पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी कलम लागली नाही. पोलिसांवर दबाव आणून ही कलम लावली. याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी केली.

वर्धा : माजी मंत्री, कॉंग्रेसचे आमदार रणजीत कांबळे (MLA Ranjeet Kamble) यांनी कॉल करून अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याची तक्रार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले (District Health Officer Dr. Ajay Dawle) यांनी रामनगर पोलिस ठाण्यात दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी आमदार कांबळेंच्या विरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान आमदार कांबळेंना अटक करण्याच्या मागणीसाठी खासदार रामदास तडस (MP Ramdas Tadas) यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर त्यांच्यासह आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. (The organizers were charged)

खासदार तडस यांनी आमदार कांबळेंवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पत्रकार परिषद घेतली. पण आमदारांवर कारवाई तर झालीच नाही, मात्र खासदार तडस यांच्यावर कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तक्रारीनंतर रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. खासदार तडस यांच्याकडे काल पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेनंतर आयोजकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चांगलीच चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. जमावबंदी असताना नियमांचे उल्लंघन करून पत्रकार परिषद आयोजित केल्याप्रकरणी निगराणी पथकाने दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, जनतेपर्यंत आवाज पोचवण्याच्या मागणीसाठी पत्रकार परिषद घेतली होती. यापूर्वीही पत्रकार परिषद झाल्या आहेत. पण खासदार तडस यांच्यावरच गुन्हा का दाखल केला, असा प्रश्‍न त्यांच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. या पत्रकार परिषदेत भाजपचे खासदार रामदास तडस, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सरिता गाखरे, महाराष्ट्र भाजप प्रदेश सचिव राजेश बकाने, भाजप जिल्हा अध्यक्ष शिरीष गोडे इतर भाजप नेते उपस्थित होते. रामनगर पोलिस ठाण्यात खासदार रामदास तडस यांच्यासह इतर जणावर गुन्हा दाखल झाला आहे.

मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली ते चालते का?
मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेतात. पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी कलम लागली नाही. पोलिसांवर दबाव आणून ही कलम लावली. याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी केली.

काय आहे प्रकरण ?
माझ्या देवळी विधानसभा मतदारसंघात आरटीपीसीआर केंद्र सुरू करताना मला का सांगितले नाही. राजकारण करत आहे का, लॉकडाऊन असताना लोकांना घरात बसवता आणि केंद्र कसले सुरू करता, अशा प्रश्‍नांची सरबत्ती करीत अश्लील शिवीगाळ केल्याची तक्रार आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी माजी मंत्री, आमदार रणजीत कांबळे यांच्या विरोधात केली. त्यानंतर रात्री उशिरा रणजीत कांबळे यांच्या विरोधात वर्धा शहर पोलिस ठाण्यात आरोग्य कर्मचारी, अधिकारी आरोग्य संस्था कलम ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

हेही वाचा : अभिनेते अनुपम खेर यांचा "युटर्न"..मोदींविषयी म्हणाले...

कोविडचे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य विभागाच्यावतीने देवळी विधानसभा क्षेत्रातील नाचणगाव येथे आरटीपीसीआर चाचणी केंद्र सुरू केले. केंद्र सुरू करताना आमदार रणजीत कांबळे यांना विचारणा न केल्याने आमदारांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना फोनवरून संताप व्यक्त केला. या संभाषणात त्यांनी अश्‍लील शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप जिल्ह्यात व्हायरल झाली होती. 
Edited By : Atul Mehere 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख