विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्राला बदनाम करण्याचा विडाच उचलला आहे… - opposition leader have taken it upon theselves to defame maharashtra | Politics Marathi News - Sarkarnama

विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्राला बदनाम करण्याचा विडाच उचलला आहे…

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 10 मे 2021

सर्व रुग्णालयांचे ऑडिट आम्ही सुरू केले आहे. ज्या रुग्णालयांच्या तक्रारी आल्या आहेत आणि जे ऑडिटमध्ये सापडतील, त्यांच्याकडून अतिरिक्त घेतलेली रक्कम वसूल करण्यात येईल आणि रुग्णांना परत करण्यात येईल. 

नागपूर : गुजरातमध्ये कोरोना (Corona in Gujarat) रुग्णांचे आणि मृतांचे आकडे लपविले जात आहेत. मध्यप्रदेशातही (Madhya Pradesh) तीच स्थिती आहे. तिकडे मृतदेहांचा सडा पडतोय. उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) एका आमदाराच्या पत्नीला रुग्णालयात भरती करून घेतले नाही म्हणून, ते आमदार अश्रू ढाळताहेत आणि विशेष म्हणजे हे आमदार भाजपचेच आहेत. हे सर्व महाराष्ट्राच्या विरोधी पक्ष नेत्यांना दिसत नाही. दिसतो तो केवळ महाराष्ट्र. (Maharashtra) त्यांना महाराष्ट्राची बदनामी जेवढी करता येईल, तेवढी ते करताहेत. त्यांनी महाराष्ट्राला बदनाम करण्याचा विडाच उचलला आहे, असा घणाघात मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला. 

कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषेत वडेट्टीवार बोलत होते. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या संदर्भात एकदम पारदर्शकता आहे. कुठेही कसलीही लपवाछपवी नाही. महाराष्ट्रात जेवढ्या लोकांच्या चाचण्या केल्या गेल्या, तेवढ्या देशात इतर कुठल्याही राज्यात केल्या गेल्या नाहीत. त्यामुळेच येथे रुग्णसंख्या मोठी दिसत आहे. कोरोनाबाधितांचे आणि मृतांचे आकडे लपवून काय मिळणार आहे? हे कळत नाही. भाजपशासीत राज्यांमध्ये हे सर्व लपविले जात आहे. गेल्या दोन वर्षांच्या आपत्तीमध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्राला काहीही मदत केलेली नाहीये. अतिवृष्टी, पुरपरिस्थितीमध्येही मदत केली नाही. पण राज्य सरकारने १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले, त्यांपैकी ४८५ कोटी रुपयेच फक्त देणे बाकी आहे. ते सुद्धा येत्या ८ ते १० दिवसांत दिले जाणार आहेत. आम्ही चार-चार पत्र पाठविले केंद्र सरकारला, पण त्याची दखलच घेतली गेली नाही. 

केंद्राकडून राज्याला मदत मिळाल्यास एचडीआरएफच्या निकषांप्रमाणे जे काही ६८०० रुपये द्यायचे आहे, त्यामध्ये राज्य सरकारची मदत मिळून ते देण्यात येतील. संपूर्णच वाटा राज्य सरकारलाच उचलायचा असल्यास मदत देण्यामध्ये अडचणी येतात. त्यामुळे आता केंद्राकडून येणाऱ्या मदतीची प्रतीक्षा आहे. ती एकदा मिळाली आणि कोरोनाची स्थिती निवळली की शेतकऱ्यांना मदत देण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. 

रुग्णालयांच्या ऑडिटचे काम सुरू…
अनेक रुग्णालये लोकांना लुटण्याचे काम करत आहेत. खरं पाहिलं तर या काळात मानवी दृष्टिकोन ठेवून एकमेकांना मदत करण्याची भावना प्रत्येकाची असली पाहिजे. आरटीपीसीआर तपासणी करतानाही लोकांची लूट केली जात आहे. काही रुग्णालये या संकटाचा फायदा घेऊन स्वतःची तिजोरी भरण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे सर्व रुग्णालयांचे ऑडिट आम्ही सुरू केले आहे. ज्या रुग्णालयांच्या तक्रारी आल्या आहेत आणि जे ऑडिटमध्ये सापडतील, त्यांच्याकडून अतिरिक्त घेतलेली रक्कम वसूल करण्यात येईल आणि रुग्णांना परत करण्यात येईल. 

हेही वाचा : भयावह...गंगा नदीत वाहू लागले आता कोरोनाबाधितांचे मृतदेह?

आरटीपीसीआरच्या संदर्भात तपासण्यांची संख्या वाढलेली आहे. आपल्याकडे लॅबची संख्या मर्यादित आहे. त्यांची क्षमता कमी पडते आहे. स्वतः नमुने घेऊन जे तपासणी करतात, त्यासाठी ६०० रुपये. रुग्ण स्वतः नमुने पाठवत असतील, तर ते तपासण्याचे दर ५०० रुपये आणि लॅबचे लोक घरोघरी जाऊन तपासणी करत असतील, तर त्यासाठी ७०० रुपये, असे सरकारने ठरवून दिलेले दर आहेत. यापेक्षा जास्त पैसे जर कुणी आरटीपीसीआरचे घेत असेल आणि त्याच्याविरोधात लेखी तक्रार प्राप्त झाली की, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे, थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश आम्ही दिलेले आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख