भयावह...गंगा नदीत वाहू लागले आता कोरोनाबाधितांचे मृतदेह? - Bodies floated down in gaga river from Uttar Pradesh amid surge of corona cases | Politics Marathi News - Sarkarnama

भयावह...गंगा नदीत वाहू लागले आता कोरोनाबाधितांचे मृतदेह?

वृत्तसंस्था
सोमवार, 10 मे 2021

कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहाचे दहन करण्यासाठी मोठ्या रांगा लागत असल्याचा दावा केला जात आहे.

पाटणा : उत्तर प्रदेश आणि बिहारमधील (Bihar) कोरोनाची स्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे. कोरोनाबाधित (Covid-19) रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालल्याने रुग्णांना बेड मिळत नाहीत. रुग्णालयाबाहेर अनेकांना जीव गमवावा लागत आहे. ग्रामीण भागातील स्थिती तर अतिशय दयनीय आहे. (Bodies floated down in Gaga river from Uttar Pradesh amid surge of Corona cases)

कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहाचे दहन करण्यासाठी मोठ्या रांगा लागत असल्याचा दावा केला जात आहे. त्यातच आता गंगा नदीत अनेक मृतदेह वाहून आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पण मृतदेह कोरोनाबाधितांचे आहे की नाहीत, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. स्थानिक प्रशासनाकडून याबाबत अद्याप खुलासा करण्यात आलेला नसला तरी स्थानिक नागरिकांनी हे मृतदेह कोरोनाबाधित रुग्णांचे असावेत, असे म्हटले आहे.

हेही वाचा : भाजप कार्यकर्त्यांचे 'गोली मारो...'चे नारे अन् त्यांना अटक करणारे IPS अधिकारी झाले कॅबिनेट मंत्री

बिहार व उत्तर प्रदेश सीमेवर गंगा नदीमध्ये मागील काही दिवसांपासून मृतदेह वाहून येत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. हे मृतदेह उत्तर प्रदेशातून वाहत येत असून कोरोरनाबाधित रुग्णांचे असावेत, असा स्थानिक प्रशासनाचा दावा आहे. 'जवळपास 40 ते 50 मृतदेह तरंगताना दिसले,' असे चौसा येथील अशोक कुमार या अधिकाऱ्यांनी सांगितले. चौसा येथील महादेव घाट परिसराती हे दृश्य पाहून नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. या भागात 100 हून अधिक मृतदेह वाहत आले असावेत, असेही त्यांचे म्हणणे आहे. 

मृतदेह मागील पाच ते सात दिवसांपासून पाण्यात असल्याचे दिसते. आम्ही ते मृतदेह पुरत आहोत. हे मृतदेह कुठून आले याचा शोध घेण्याची गरज आहे. वाराणसी, अलाहाबाद की अन्य कोणत्या ठिकाणांहून आले हे शोधावे लागेल, असे के. के. उपाध्याय या अधिकाऱ्यांनी सांगितले. हे मृतदेह येथील नाहीत. याठिकाणी मृतदेह नदीत सोडण्याची परंपरा नाही, असेही ते म्हणाले. लोकांना नदीतील पाणी आणि मृतदेहांमुळे संसर्गाची भीती वाटत आहे. हे मृतदेह आम्ही पुरत असल्याचे नरेंद्र कुमार या स्थानिकाने सांगितले.

दरम्यान, यावरून आता बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये एकमेकांवर टोलवाटोलवी सुरू झाली आहे. शनिवारीही यमुना नदी पात्रामध्ये अर्धवट जळालेले मृतदेह आढळून आले होते. काँग्रेसने यावरून सरकारवर टीका केली आहे. नदीत आढळून आलेले मृतदेह हे कोरोनाच्या लपवलेल्या मृत्यूचे पुरावे असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. देशात मागील काही दिवसांपासून दररोज चार हजार मृत्यू कोरोनामुळे होत आहेत. 

Edited By Rajanand More
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख