कोविड सेंटरमधून बाहेर जाऊन मद्य प्राशन करून परत येतात रुग्ण, प्रशासन अनभिज्ञ ! - patients come out of covid center and come back drunk administration ignorant | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोविड सेंटरमधून बाहेर जाऊन मद्य प्राशन करून परत येतात रुग्ण, प्रशासन अनभिज्ञ !

संजय जाधव
शुक्रवार, 19 मार्च 2021

समाजसेवक या कोविड रुग्णाच्या संपर्कात आले. पण त्याला रुग्णालयात भरती करेपर्यंत त्यांनाही माहिती नव्हते की, तो मनुष्य कोरोना पॉझिटिव्ह आहे. त्याला रुग्णालयात भरती केल्यानंतर संबंधित रुग्णाच्या नातेवाइकांना फोन करून माहिती दिल्यावर कळले की हा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहे.

बुलडाणा : कोविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांची जेवणाची व्यवस्था योग्य नसल्यामुळे काही रुग्ण सेंटरमधून बाहेर पडतात. हॉटेल, ढाब्यांवर मनसोक्त दारू ढोसून आणि जेवण करून पुन्हा सेंटरमध्ये परत येतात. हा प्रकार खामगाव येथील घाटपुरी कोविड सेंटरवर घडत आहे. त्यामुळे कोरोना वेगाने पसरण्याचा धोका वाढत आहे. पण प्रशासन या प्रकारापासून अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे. 

जिल्ह्यात सातत्याने दररोज ६०० रुग्ण वाढत आहेत. दररोज कोविड सेंटरमधून रुग्ण पळून जाऊन जवळच्या हॉटेलात किंवा ढाब्यावर जेवण व मद्यप्राशन करून रात्री परत कोविड सेंटर मध्ये दाखल होतात. खामगाव येथील घाटपुरी कोविड सेंटरमधून असेच काही कोरोना रुग्ण दाखल असताना रात्री पळून गेले व राष्ट्रीय महामार्गावरील एका ढाब्यावर मनसोक्त मद्यप्राशन करून परत कोविड सेंटरला जातात. असेच जेवण करून कोविड सेंटरच्या दिशेने जात असताना नांदुरा येथील एक ५५ वर्षीय रुग्ण अति मद्यप्राशन केल्याने महामार्गावर मध्यभागी पडलेला आढळला. काही समाजसेवकांनी त्याला उचलून सामान्य रुग्णालयात भरती केले. 

हे समाजसेवक या कोविड रुग्णाच्या संपर्कात आले. पण त्याला रुग्णालयात भरती करेपर्यंत त्यांनाही माहिती नव्हते की, तो मनुष्य कोरोना पॉझिटिव्ह आहे. त्याला रुग्णालयात भरती केल्यानंतर संबंधित रुग्णाच्या नातेवाइकांना फोन करून माहिती दिल्यावर कळले की हा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहे. गेल्या तीन दिवसांपासून घाटपुरी कोविड सेंटरमध्ये भरती करण्यात आलेला आहे. जिल्ह्यात सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अशा प्रशासनाच्या अशा निष्काळजीपणामुळे जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणात येत नसल्याचे बोलले जात आहे. सदर कोविड सेंटर हे महामार्गालगत आहे आणि रुग्णांना चांगलं जेवण मिळत नसल्याने असे प्रकार नित्याचेच असल्याचे जवळच असलेल्या हॉटेलमधील कर्मचारी सांगत आहेत.

हेही वाचा : वाझे प्रकरणानंतर 'गुप्तवार्ता विभागा'च्या अधिकारांवर गदा? 

कोरोनाची दहशत पुन्हा वाढत आहे. मागच्या वर्षी मार्च महिन्यातली परिस्थिती यावर्षी पुन्हा उद्भवली आहे. या परिस्थितीतही प्रशासन गंभीर नसल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. खासगी प्रयोगशाळांतून तपासण्या करून दिले जात असलेले अहवालही संशयास्पद असल्याचे गेल्या काही दिवसांतील घटनांवरून दिसून येते. यासंदर्भात तक्रारीही झालेल्या आहेत, पण प्रशासनाकडून त्याची दखल घेऊन कारवाई झालेली नाही. त्यामुळे कोरोनाची स्थिती खरंच गंभीर आहे की लॉकडाऊन करून विनाकारण लोकांना वेठीस धरले जात आहे, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.
 Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख