वाझे प्रकरणानंतर 'गुप्तवार्ता विभागा'च्या अधिकारांवर गदा?  - CIU will be given less importance by mumbai cp  CIU will be given less importance by mumbai cp   | Politics Marathi News - Sarkarnama

वाझे प्रकरणानंतर 'गुप्तवार्ता विभागा'च्या अधिकारांवर गदा? 

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 19 मार्च 2021

मुंबईचे नवे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडून सीआययूचे (गुप्तवार्ता विभाग) महत्त्व कमी करण्याची शक्यता आहे. नगराळे यांनी परमबीर सिंह यांच्याकडून सूत्रे हाती घेतल्यानंतर आता मिशन क्लीन अप ड्राइव्ह सुरू होणार असल्याची चर्चा आहे. मात्र ही क्लीन अप ड्राइव्ह आहे की आणखी काही, हा येणारा काळच सांगू शकेल.

मुंबई: सचिन वाझे प्रकरणानंतर क्राईम इंटेलिजेन्स युनिटचे (गुप्तवार्ता विभाग) महत्त्व कमी होत त्यांच्या अधिकारांवर गदा येणार असल्याचे सूतोवाच मिळत आहेत. मुंबईचे नवे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडून सीआययूचे महत्त्व कमी करण्याची शक्यता आहे. नगराळे यांनी परमबीर सिंह यांच्याकडून सूत्रे हाती घेतल्यानंतर आता मिशन क्लीन अप ड्राइव्ह सुरू होणार असल्याची चर्चा आहे. मात्र ही क्लीन अप ड्राइव्ह आहे की आणखी काही आहे, हा येणारा काळच सांगू शकेल.  

या पूर्वी ९० च्या काळात अंडरवर्ल्ड गुंडांचा नायनाट करण्यासाठी एन्काऊंटर स्पेशलिस्टचे पथक नावारुपाला आणले गेले होते. त्या पथकाकडून ज्या वेळी चुकीच्या गोष्टी होऊ लागल्या, त्यावेळी हे पथक बंद करण्यात आले. त्याच पार्श्वभूमिवर मुंबईत समाज सेवा शाखेकडून लेडिजबार आणि इतर गैरप्रकारांना आळा घातला जात होता. त्यावेळी देखील कारवाई न करण्यासाठी आर्थिक व्यवहार होऊ लागले. त्यानंतर या खात्याचे महत्त्व देखील कमी करण्यात आले होते. त्यानुसार वाझे प्रकरण सीआययू पथकावर चांगलेच शेकणार असल्याचे दिसते. 

सचिन वाझे गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख होते. गुप्तवार्ता विभागात राहूनच गैरकृत्य करण्यात आल्याने या विभागावरच मोठा बांका प्रसंग ओढावला असून त्याचे अस्तित्त्वच धोक्यात आले आहे. कुंपणच शेत खात असल्यामुळे या विभागाला येत्या काही दिवसात टाळा लागू शकतो, अशी चिन्हे आहेत. दरम्यान, वाझे प्रमुख असलेल्या गुप्तवार्ता विभागातील अधिकारी रियाझ काझी यांनी माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शविल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

काझी हे वाझे यांचे गुप्तवार्ता विभागातील निकटवर्तीय होते. वाझे यांनी अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या केलेल्या तपासात ते सहभागी होते. याशिवाय वाझे यांच्या सांगण्यावरून काझी यांनीच गाड्यांच्या नंबरप्लेट तयार करुन आणल्याचा आरोप आहे. वाझे राहत असलेल्या ठाण्यातील साकेत सोसायटीचे सीसीटीव्ही फूटेजही काझी यांनी ताब्यात घेतले होते. त्यामुळे काझी यांना अंबानींच्या घराबाहेर ठेवलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातील जवळपास सर्व घटनाक्रम माहिती असल्याचे दिसून येते. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख