१५०० रुपयांसाठी ठोठावला ४ वर्ष कारावास आणि १० हजाराचा दंडही... - he was sentenced to four year imprisonment and fine rs ten thousand | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

१५०० रुपयांसाठी ठोठावला ४ वर्ष कारावास आणि १० हजाराचा दंडही...

अभिजित घोरमारे
बुधवार, 31 मार्च 2021

एसीबीने ७ ऑगस्ट २०१५ ला सापळा रचून अभियंता डहातला अटक केली. जिल्हा सत्र न्यायालयाने लाचखोर आरोपीला ४ वर्ष सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर लाचखोरांचे धाबे दणाणले आहे. 

भंडारा : अति लालसा आणि अतिरिक्त पैसे कमावण्याचा हव्यास माणसाला एक दिवस पश्‍चाताप करायला लावतो, हे नक्की. गोंदीया पंचायत समितीमध्ये कार्यरत एका कंत्राटी अभियंत्यावर अशीच वेळ आली. त्याने १५०० रुपयांची लाच घेतल्यामुळे त्याला १० हजार रुपयांचा दंड आणि ४ वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. 

ओमप्रकाश डहात हा ४८ वर्षीय कंत्राटी अभियंता गोंदिया पंचायत समितीमध्ये कार्यरत होता. तेव्हा त्याने एका विहिरीच्या बांधकामाचे बील काढून देण्यासाठी १५०० रुपयांची लाच संबंधिताला मागितली होती. त्या व्यक्तीने रक्कम देण्याचे कबूल केले. पण गोंदीया लाचलुचपत विभागाकडे अभियंत्याची तक्रारही केली. एसीबीने ७ ऑगस्ट २०१५ ला सापळा रचून अभियंता डहातला अटक केली. जिल्हा सत्र न्यायालयाने लाचखोर आरोपीला ४ वर्ष सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर लाचखोरांचे धाबे दणाणले आहे. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धडक कारवाया व त्यानंतर न्यायालयातून ठोठावण्यात येणाऱ्या शिक्षा, यांनंतरही लाचखोरांचे प्रमाण का कमी होत नाही, हा चिंतेचा विषय आहे. शासनाच्या सर्व विभागांचा विचार केल्यास दरवर्षी शेकडो नव्हे तर हजारो प्रकरणे अशी घडतात. कारवायासुद्धा केल्या जातात. पण लाचखोरी काही कमी होत नाही. गेल्या महिन्यात तत्कालिन पोलिस महासंचालक आणि सध्याचे मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनीही ‘भ्रष्टाचार हा सिस्टमचा एक भाग आहे’, असे वक्तव्य नागपुरात केले होते. यावरून भ्रष्टाचाराची पाळेमुळे किती खोलवर रुजलेली आहेत, याची कल्पना यावी. 

हेही वाचा : दीपाली चव्हाण यांना ॲट्रॉसिटीच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आले होते

कंत्राटी अभियंता ओमप्रकाश डहातला सुनावलेल्या शिक्षेमुळे मोठा भ्रष्टाचार नाही, पण चिरीमिरी घेणाऱ्यांना तरी वचक बसावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यासाठी जनतेनेही निर्भीडपणे पुढे येऊन तक्रारी केल्या पाहिजे. पण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून वारंवार आवाहन करुनही लोक पुढे येत नाही. परिणामी भ्रष्टाचार फोफावतो. त्यामुळे यासाठी प्रत्येकाने आग्रही भूमिका घेणे क्रमप्राप्त ठरते. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख