ऑलिंपिकपट्टू प्रवीण जाधवच्या कुटुंबास घर पाडण्याची धमकी; जिल्हा सोडण्याची केली तयारी
Olympian Praveen Jadhav's family threatened to demolish his house; Preparing to leave the district

ऑलिंपिकपट्टू प्रवीण जाधवच्या कुटुंबास घर पाडण्याची धमकी; जिल्हा सोडण्याची केली तयारी

मुलाने ज्या गावाचा नावलौकिक जागतिक स्तरावर वाढवला. तेथेच दमदाटीची भाषा होऊ लागल्याने घाबरलेले हे कुटुंब सातारा जिल्हाच सोडून जाण्याच्या मानसिकतेत आहेत

फलटण शहर : टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत धनुर्विद्या खेळासाठी पात्र ठरलेल्या प्रवीण जाधवमुळे सरडे (ता. फलटण) गावाचे नाव जागतिक पातळीवर पोहोचले. त्या जाधव कुटुंबास घर बांधण्याच्या कारणावरुन गावातील काहीजण दमदाटी करुन जेसीबीने घर पाडण्याच्या धमक्या देत आहेत. सध्या हे कुटुंब भितीच्या छायेखाली वावरत असून सरडे गाव नव्हे तर सातारा जिल्हाच सोडण्याच्या मानसिकतेत जाधव कुटुंबिय आहे. Olympian Praveen Jadhav's family threatened to demolish his house; Preparing to leave the district

सरडे (ता. फलटण) येथील प्रवीण रमेश जाधव हा ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आणि सरडे गाव प्रसिध्दीच्या झोतात आले. प्रतिकूल परिस्थितीतून जिद्द, चिकाटी व खडतर परिश्रमाच्या या यशाचे कौतुक जगभरातून झाले. पण स्थानिक पातळीवरून त्यांच्या कुटुंबांना मात्र, त्रास होऊ लागला आहे. प्रवीणचे आजोबा व आजी हे दोघेही शेती महामंडळामध्ये कामाला होते.

निवृत्तीनंतर त्यांनी मिळणारी फंडाची रक्कम न घेता शेती महामंडळाकडे घरासाठी जागेची मागणी केली होती. महामंडळातील तत्कालीन एका अधिकाऱ्याने त्यांना शेती महामंडळाच्या जागेत तोंडी घर बांधण्यास सांगितले. तेथे प्रवीणच्या वडीलांनी एक खोपट बांधले. प्रवीणचे वडील रमेश जाधव व आई संगीता जाधव हे आजही मजूरी करतात. 

प्रवीण सैन्यदलात भरती झाल्यानंतर व अर्चरीच्या निमित्ताने थोडेफार पैसे जमेल तसे पैसे प्रवीण वडिलांना पाठवित होता. त्यातून वडिलांनी दोन खोल्यांचे बांधकाम केले. या दोन खोल्यापैकी एक खोली चुलत्यांना दिली व एकामध्ये प्रवीणचे आई वडील राहतात. सदर घराशेजारील शेती महामंडळाच्याच जागेत प्रवीणने बंगलावजा घराचे काम सुरु केले होते. पाया खोदला, साहित्यही आणले. परंतू आसपासच्या काहींनी दमदाटीने हे काम रस्त्याचे कारण सांगून बंद पाडले.

यानंतर हे काम पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न प्रवीणच्या वडीलांनी केला असता त्यांना बांधकाम न करण्याविषयी धमकाविण्यात आल्याने व हे कुटुंब सध्या भितीच्या छायेखाली आहे. मुलाने ज्या गावाचा नावलौकिक जागतिक स्तरावर वाढवला. तेथेच दमदाटीची भाषा होऊ लागल्याने घाबरलेले हे कुटुंब सातारा जिल्हाच सोडून प्रवीणच्या आईचे माहेर असलेल्या जीरेगाव (ता. बारामती) येथे वास्तव्यास जाण्याच्या मानसिकतेत आहे. या पूर्वीही जाधव यांनी बांधकाम करताना त्यांना विरोध करण्यात आल्याने त्यांनी बांधकाम साहित्य निम्म्या किंमतीत विकावे लागले. शौचालयही बांधू न दिल्याने ते साहित्य दुसऱ्यांना फुकट द्यावे लागले.

प्रवीण जाधव व संबंधित विरोध करणाऱ्यांमध्ये जमिनविषयक वाद होते. दोन दिवसांपूर्वी मी स्वतः व पोलिस उपअधिक्षक तानाजी बरडे यांनी सरडे येथे जावून पाहणी केली होती. त्यांच्यामध्ये समझोताही घडवून आणलेला होता. परंतू आज तेथे आणखी वाद झाल्याचे लक्षात आले. त्या दोघांशी पुन्हा चर्चा करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत हा वाद पूर्णपणे मिटविण्यात येतील.

- डॉ. शिवाजीराव जगताप (प्रांत अधिकारी, फलटण)
 

Related Stories

No stories found.