तीन पक्षांनी सत्ता टिकवून दाखवावी; भाजपचं महाविकास आघाडीला आव्हान - BJP MLA Atul Bhatkhalkar criticise Congress leader Bhai Jagtap | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

तीन पक्षांनी सत्ता टिकवून दाखवावी; भाजपचं महाविकास आघाडीला आव्हान

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 29 जून 2021

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रभाग पुनर्रचनेचा मुद्दा चर्चेला आला आहे.

मुंबई : राज्यातील तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारसमोरील आव्हान दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शिवसेना (Shivsena), काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या तीन पक्षांमध्ये समन्वय नसल्याची टीका भाजपकडून केली जात आहे. त्यातच आता मुंबईसह (BMC) काही प्रमुख महापालिकांच्या निवडणुका पुढील वर्षी होणार असून सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. मुंबई महापालिकेतील सत्ता तीनही पक्षांनी एकत्रित येत टिकवून दाखवावी, असं आव्हान भाजपनं आघाडीला दिलं आहे. (BJP MLA Atul Bhatkhalkar criticise Congress leader Bhai Jagtap)

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रभाग पुनर्रचनेचा मुद्दा चर्चेला आला आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी पालिकेच्या प्रभाग पुनर्रचनेवरून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी जगताप यांच्या या आरोपांना उत्तर दिलं आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षांचे रडगाणे पाहता त्यांना संभाव्य पराभव दिसत असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळंच त्यांनी आता सबबी सांगण्यास सुरुवात केली आहे. आता तीनही पक्षांनी पालिकेत सत्ता टिकवून दाखवावी, असे आव्हान भातखळकर यांनी दिलं. 

हेही वाचा : धक्कादायक निर्णय : कोरोनानं मृत्यू झाल्यास मृतदेह घरी नेता येणार

महापालिकेच्या कामकाजावरही भातखळकर यांनी टीका केली आहे. नालेसफाईत १०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसनेच केला आहे. निविदा काढताना टक्केवारीत सहभागी व्हायचे आणि बाहेर आरोप करायचे, हे काँग्रेसचे तंत्र आहे. टक्केवारीतला पुरेसा वाटा मिळाला नाही, अशी खोचक टीका भातखळकर यांनी केली आहे. 

आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवत काँग्रेसकडून दिशाभूल केली जात आहे. एकीकडे राज्यात शिवसेनेबरोबर सत्ता उपभोगत असलेला काँग्रेस पक्ष महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा देत आहे. त्यातूनच फडणवीस मुख्यमंत्री असताना झालेल्या प्रभाग रचनेवरून टीका करत आहेत. पण बहुधा जगताप यांना नागरिकशास्त्र माहित नाही. ही पुनर्रचना कोणताही राजकीय पक्ष करत नाही. राज्य निवडणूक आयोगाकडून ही रचना केली जाते, असा टोलाही भातखळकर यांनी लगावला. 

दरम्यान, पुढील वर्षी महापालिकांच्या निवडणुका होणार असल्या तरी लवकरच कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात असल्याने या निवडणुकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. महाविकास आघाडी सरकारकडून निवडणुका लांबणीवर टाकल्या जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या मराठा व ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही तापलेला असल्याने या निवडणुकांत आघाडीला फटका बसण्याची शक्यताही आहे. त्यामुळं निवडणुका लांबणीवर टाकण्याबाबत आघाडी सरकार गंभीर असल्याची चर्चा आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख