मुख्यमंत्र्यांनी पूजेला येण्याचं टाळावं, पांडूरंग पुजा स्वीकारणार नाही! - Bandatatya Karadkar criticize CM Uddhav Thackeray over Mahapooja | Politics Marathi News - Sarkarnama

मुख्यमंत्र्यांनी पूजेला येण्याचं टाळावं, पांडूरंग पुजा स्वीकारणार नाही!

वृत्तसंस्था
रविवार, 18 जुलै 2021

यंदाही राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारीला परवानगी नाकारली आहे.

पुणे : वारकरी संप्रदायातील बंडा तात्या कराडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान साधले आहे. आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्र्यांनी पांडूरंगाच्या महापूजेला येऊ नये, पांडूरंग पुजा स्वीकारणार नाही, असे कराडकर म्हणाले आहेत. महाराष्ट्रात भगव्या झेंड्याचा अपमान सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. (Bundatatya Karadkar criticize CM Uddhav Thackeray over Mahapooja)

यंदाही राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारीला परवानगी नाकारली आहे. हा निर्णय मान्य नसलेल्या वारकरी संप्रदायाचे बंडा तात्या कराडकर यांना पोलिसांनी 20 तारखेपर्यंत स्थानबद्ध केलं आहे. त्यावरून भाजपसह विरोधी पक्षांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीकाही केली. कराडकर यांच्याकडूनही सातत्याने सरकारला लक्ष्य केलं जात आहे. आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडूरंगाची महापुजा होणार आहे. त्यावरूनही कराडकर यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.  

हेही वाचा : नाना माझे मोठे बंधू पण जवळच्या लोकांनी चुकीचा मेसेज दिला!

कराडकर यांनी अत्यंत कठोर शब्दांत मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी जनाची नाही तर मनाची लाज बाळगून पांडुरंगाच्या पूजेला येण्याचं टाळावं. गेले चार महिने वारकऱ्यांचं आंदोलन गुंडाळले आहे. त्यावरून महाराष्ट्रात भगव्या झेंड्याचं राज्य असल्याचे वाटत नाही. राज्यात भगव्या झेंड्याचा अपमान सुरु आहे.

वारकऱ्यांच्या पताका टाळ चिपळ्या काढून घेतल्या जात आहेत. वारकऱ्यांच्या पोशाखात न चालण्याचा दम पोलिस देत आहेत. दडपशाही करून महाराष्ट्रातील पायी वारी सोहळे रद्द करण्यात आले. त्यामुळे तुमची पुजा पांडुरंग स्वीकारणार नाही. त्यामुळे पूजेला जाणं टाळावं, असे कराडकर म्हणाले. 

दरम्यान, समूहाने न जाता टप्याटप्याने वारकरी पंढरपूरकडे पायी जातील, असं बंडा तात्या कराडकर यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार, पहाटे पाच वाजताच्या सुमारास काही वारकऱ्यांनी पायी चालायला सुरुवात केली. तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवलं आणि या सर्वांना सोडविण्यासाठी कराडकर तिथं पोहचले. मग पोलिसांनी कराडकर यांनाही ताब्यात घेत स्थानबद्ध केलं. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख