आदित्य ठाकरेंच्या हिरव्यागार लाॅबीची जयंत पाटलांना भुरळ - Minister Aditya Thackeray's green lobby fascinates Minister Jayant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

आदित्य ठाकरेंच्या हिरव्यागार लाॅबीची जयंत पाटलांना भुरळ

ज्ञानेश सावंत
बुधवार, 30 जून 2021

मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची दालने आहेत.

मुंबई : राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मंत्रालयातील केबिनशेजारच्या लॉबीवर जलसंपदा मंत्री जयंत पाटलांचे विशेष प्रेम असल्याचे उघड झाले आहे. या लॅाबीत बसून पाटील आपल्या बैठका आटोपत आहेत. अर्थात, मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर ठाकरेंऐवजी जयंतरावाची सर्वाधिक उठबस वाढल्याने त्यांच्या पाटीलकीचा धाक दिसतो आहे. एकटे पाटीलच नव्हे, तर त्यांच्या दिमतीला असलेल्यांचा राबताही याच मजल्यावर असल्याचे पाहायला मिळत आहे. (Minister Aditya Thackeray's green lobby fascinates Minister Jayant Patil)

मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची दालने आहेत. कोरोनाच्या साथीत मंत्रालयात, त्यात ठाकरे यांच्या दालनात लोकांची गर्दी नसते. परंतु कामे घेऊन येणाऱ्यामुळे जुन्या इमारतीतील सहाव्या मजल्यावरील पाटील यांच्या केबिनबाहेर सकाळपासून पाय ठेवायलाही जागा नसल्याचे चित्र दिसते.

हेही वाचा : काँग्रेसनंही थोपटले दंड; शिवसेनेपाठोपाठ आमदारांना जारी केला व्हीप

राज्यात महामंडळाच्या नेमणुकांचा विषय पुढे आल्यापासून तर पाटील यांचे मंत्रालयातील केबिन हे पक्षाचे नेते, पदाधिकाऱ्यानी भरलेले असते. त्यातून पाटलांना बैठकाच काय तर साधे जेवणही वेळेत करता येत नाही. कोरोनाही कमी होत नसल्याने पाटील आणि त्यांची टीम हैराण झाली आहे. या सार्‍यातून थोडासा वेळ काढून पाटील काही दिवसांपूर्वी नव्या इमारतीतील आदित्य ठाकरेंच्या केबिनमध्ये आले तेव्हा ठाकरेंच्या केबिनशेजारीच मोकळ्या लॅाबीने पाटलांना भुरळ घातली.

आता या लॅाबीने पाटलांच्या मनात घर केले आहे. त्याचे कारणही तसे  आहे. लॉबीत लाॅन, रंगीबेरंगी झाडे असल्याने ती हिरवीगार असून तिथे येणारा पाहुणा बैठकच मारतो. विशेष म्हणजे मंत्रालय परिसरातील साऱ्या जुन्या इमारतीपासून  अवघ्या  दक्षिण मुंबईचे देखणे रूप लॉबीतून आकर्षित करते. ठाकरे हे मंत्रालयात नसल्याने पाटील आपल्या दालनातील कामे बैठका आटोपून थेट ठाकरेच्या केबिनच्या दिशेने निघतात आणि पुढच्या बैठका तेथेच घेतात.

मराठवाड्यातील सलग आठवडाभराची  संवाद यात्रा आटोपून आलेले पाटील बुधवारी सकाळी मंत्रालयात आले. पण दालन, त्याच्या  बाहेरची गर्दी पाहून ते सातव्या मजल्यावरील लॉबीत पोचले. नियोजित तीन बैठका तिथेच उरकल्या. ठाकरेंनी नटवलेल्या या लॉबीवरील जयंत पाटलांचे प्रेम आता वाढतच चालले आहे. त्यामुळे ठाकरे यांचे प्रेम जयंत पाटलांच्या वाट्याला, याची चर्चा मंत्रालयाच्या वर्तुळात रंगल्यास नवल वाटायला नको.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख