काँग्रेसनंही थोपटले दंंड; शिवसेनेपाठोपाठ आमदारांना जारी केला व्हीप

हिवाळी अधिवेशनातच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी, असा काँग्रेसचा आग्रह आहे.
Maharashtra Congress issues whip to all MLAs amid assembly session
Maharashtra Congress issues whip to all MLAs amid assembly session

मुंबई : राज्याच्या विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्षांमधील हालचालींना वेग आला आहे. अधिवेशन पाच व सहा जुलै असे दोन दिवस होणार असून दोन्ही दिवशी आमदारांनी पूर्णवेळ उपस्थित राहण्याबाबतचा व्हीप मंगळवारी रात्री शिवसेनेने जारी केला. त्यानंतर बुधवारी काँग्रेसने सर्व आमदारांना व्हीप जारी केला आहे.

हिवाळी अधिवेशनातच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी, असा काँग्रेसचा आग्रह आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनेही आता त्यासाठी मान्यता दिली आहे. त्यानंतर काल रात्री शिवसेनेने मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्या स्वाक्षरीचा व्हीप सर्व आमदारांना जारी केला. तर आज  काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहबे थोरात यांनी व्हीप जारी केला. विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार आहे. 

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पाठविलेल्या पत्रानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.  हे पद काँग्रेसकडे असून, अध्यक्ष निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. यात संग्राम थोपटे (Sangram Thopte), सुरेश वरपूडकर (Suresh Warpudkar) यांच्यासह अमिन पटेल (Amin Patel) यांचेही नाव आघाडीवर आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नवीन अध्यक्षांचे नाव 5 जुलैलै जाहीर होईल, अशी घोषणा केली आहे. 

विधानसभा अध्यक्षपदासाठीच्या घडामोडींना वेग आला आहे. आज थोरात यांनी जारी केलेल्या व्हीपमध्ये सर्व आमदारांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. अधिवेशनात सोमवारी पुरवण्या मागण्या, शासकीय कामकाज, शोक प्रस्ताव तसेच मंगळवारी पुरवणी मागण्यांवर चर्चा, विनियोजन विधेयक व शासकीय विधेयके यावर चर्चा व मतदान होऊन ते संमत करण्यात येणार आहेत, असे व्हीपमध्ये म्हटलं आहे. 

अध्यक्षपदाच्या निवडीबाबत नाना पटोले म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष निवड या विधिमंडळ अधिवेशनात होणार आहे. विधानसभा अध्यक्षांच्या नावाची घोषणा 5 जुलैला होईल. काँग्रेसमध्ये कुठलीही अंतर्गत नाराजी नाही. मी मंत्रिपदाची मागणी केली नाही. पक्ष देईल ती जबादारी मी पार पाडत आहे आणि माझ्यावर कोणताही मंत्री  नाराज नाही. महाविकास आघाडी मध्ये कुठलीही नाराजी नाही. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची काल भेट घेतली असून, यात अधिवेशन आणि इतर विषयांवर चर्चा झाली. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात नवे धोरण आम्ही अधिवेशनात मांडणार आहोत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने 23 जूनला राज्यपालांची भेट घेतली होती. यात त्यांनी काही मागण्या केल्या होत्या. यावर राज्यपालांनी 24 जूनला मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्यात विधानसभा अध्यक्षांचे संविधानिक पद तातडीने भरण्याबाबत कार्यवाही करण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. राज्यपालांच्या पत्रानंतर महाविकास आघाडीमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com