डझनावर आजी-माजी मंत्री, आमदार-खासदार लोणावळ्यात कशावर चिंतन करणार... - dozens of former ministers mlas and mps will think about what in lonawala | Politics Marathi News - Sarkarnama

डझनावर आजी-माजी मंत्री, आमदार-खासदार लोणावळ्यात कशावर चिंतन करणार...

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 23 जून 2021

राज्याच्या ६ जिल्ह्यांतील रद्द झालेले राजकीय आरक्षण व लागलेली निवडणूक स्थगित करण्यात यावी, यांसह १२ बलुतेदार १८ अलुतेदार यांच्या उत्थानासाठी शासनास प्रस्ताव सादर करून लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये विकासनिधी देण्यात यावा

मुंबई :  ओबीसींच्या प्रश्नांवर चिंतन व मंथन करण्यासाठी शनिवार व रविवार दिनांक २६ आणि २७ जून रोजी ओबीसी चिंतन‍ शिबिर लोणावळयात आयोजित करण्यात आले आहे. OBC meditation camp has been organized in Lonavla या शिबिरात सहभागी होणारे डझनावर आजी-माजी मंत्री, आमदार आणी खासदार चिंतन नेमके कशावर करणार याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष राहणार आहे. कारण आज जे विरोधात आहेत, ते सत्ताधाऱ्यांवर ओरडतात आणि पूर्वी जे सत्तेत होते, ते आजच्या विरोधकांवर टिका करतात. त्यामुळे या शिबिरात हे सर्व नेते ओबीसी आणि व्हीजेएनटी आरक्षणावर एकत्र येतात की येथे सत्ताधारी आणि विरोधी अशीच भूमिका वठवतात, हे बघावे लागणार आहे. 

नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होणार असून मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. दोन दिवसीय चालणाऱ्या या शिबिराला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी मंत्री बबनराव ढाकणे, माजी आमदार नारायण मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री अण्णा डांगे, मंत्री दत्त्तात्रय भरणे,  मंत्री सुनील केदार, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री संजय राठोड, माजी मंत्री माणिकराव ठाकरे, खासदार बाळू धानोरकर, माजी मंत्री परिणय फुके, आमदार विकास ठाकरे, आमदार महेंद्र दळवी, याव्यतिरिक्त विविध राजकीय पक्षांतील व विविध ओबीसी चळवळीतील आजी माजी खासदार व संघटनांचे प्रतिनिधी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. सर्वपक्षीय ओबीसी नेते आणि कार्यकर्ते या शिबिरात सहभागी होणार आहेत. 

ओबीसी आरक्षणातील अनेक समस्या, ओबीसी व्हीजेएनटीतील जिल्हावार नोकरीतील कमी झालेलं आरक्षण, ओबीसीची स्वतंत्र जनगणना यांसह अनेक विषयांवर शिबिरात मंथन करण्यात येणार असून शिबिरातील तज्ज्ञ, मार्गदर्शक यांच्याकडून संकलित होणाऱ्या  माहीतीवर चिंतन होऊन अभ्यासपूर्वक अजेंडा तयार करून ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र व राज्य शासनास ओबीसींची भूमिका  यावेळी सादर केली जाणार आहे. या बैठकीस राज्यातील तज्ज्ञ ओबीसी अभ्यासक, संवैधानिक अभ्यासक मार्गदर्शन करणार असून दोन दिवस सहा सत्रांत हे शिबिर संपन्न होणार आहे.  

हेही वाचा : जयंत पाटील यांचे नगर जिल्ह्यावर लक्ष : एका भाच्याला केले मंत्री; घुलेंच्या जावयाला साईसंस्थान!

राज्याच्या ६ जिल्ह्यांतील रद्द झालेले राजकीय आरक्षण व लागलेली निवडणूक स्थगित करण्यात यावी, यांसह १२ बलुतेदार १८ अलुतेदार यांच्या उत्थानासाठी शासनास प्रस्ताव सादर करून लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये विकासनिधी देण्यात यावा, पदोन्नतीमध्ये ओबीसींना आरक्षण देण्यात यावे, तसेच लोकसंख्येच्या प्रमाणात लोकसभा व विधानसभेत प्रतिनिधित्व देण्यात यावे, या विषयांवर लोणावळ्याच्या चिंतन आणि मंथन शिबिरात चर्चा होणार आहे. यावेळी उपस्थित प्रतिनिधींकडून ज्या सूचना येतील, त्यांचा समावेश मागणीपत्रात केला जाईल आणि या शिबिरामध्ये झालेला ठराव हा ओबीसींचा अजेंडा असेल, अशी माहिती ओबीसी, व्हीजेएनटी जनमोर्चा अध्यक्ष बाळासाहेब सानप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी प्रदेशाध्यक्ष  ईश्वर बाळबुधे, राष्ट्रीय ओबीसी महासंघ महासचिव सचिन राजूरकर, ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चा राज्य समन्वयक तथा उपाध्यक्ष अरुण खरमाटे, बेलदार समाजाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजू साळुंके यांनी दिली.
Edited By : Atul Mehere
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख