कोणाच्या आव्हानाला मी भिक घालत नाही; मी ९६ कुळी मराठा... - I am 96 Kulis Maratha: I have not bullied anyone, I am able to protect them says MLC Shashikant Shinde | Politics Marathi News - Sarkarnama

कोणाच्या आव्हानाला मी भिक घालत नाही; मी ९६ कुळी मराठा...

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 7 मे 2021

मराठा आरक्षण कोणी केले मोदींनी केले की, फडणवीसांनी केले की या सरकारने केले, हा दोषारोप करून राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी आरक्षण कसे मिळवायचे यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. यापुढे ज्या ज्या वेळी मराठा समाजाचे आंदोलन होईल, त्यावेळी शशीकांत शिंदे सर्वात पुढे असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

सातारा : मी कोणाच्या आव्हानाला भिक घालत नाही. पण, मी ९६ कुळी मराठा (96 Kulis Maratha) असून मराठा समाजाशी कधीही भावनिक राजकारण केलेले नाही. साताऱ्यातील त्या मुलांच्या कुटुंबियांची समजूत काढण्यासाठी तेथे गेलेलो होतो. त्यांना कोणतीही दमबाजी केलेली नाही. ही मुले कोणत्या राजकिय पक्षाशी संबंधित असली तरी ती मराठा आहेत. त्यामुळे त्यांच्या केसालाही धक्का लागला तर त्यांचे संरक्षण करायला शशीकांत शिंदे समर्थ आहे, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे आमदार शशीकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी नरेंद्र पाटलांच्या (Narendra Patil) टीकेवर दिले आहे. (I am 96 Kulis Maratha: I have not bullied anyone, I am able to protect them says MLC Shashikant Shinde)

माथाडी नेते व माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत शशीकांत शिंदेंवर सडेतोड टीका केली होती. या टीकेला श्री. शिंदे यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, मी मराठा आहे का नाही, हे मला व महाराष्ट्रातील मराठा समाजातील नेत्यांना व तरूणांना माहित आहे. मी कधीही मराठा समाजाचे भावनिक राजकारण करत नाही. या समाजासाठी मी  प्रामाणिकपणे काम करत आहे.

हेही वाचा : दिल्लीच्या फोनमुळे संदीप गुळवे काँग्रेसमध्ये परतले

ज्या ज्यावेळी मराठा आरक्षणासाठी आंदोलने झाली. त्या त्या वेळी प्युअर मराठा म्हणून आंदोलनात अगदी आझाद मैदानापर्यंत सहभागी झालो होतो.
सातारा जिल्ह्यात असो, नवी मुंबईत, कळंबोली असो अनेक ठिकाणी मराठा तरूणांना अटक झाली ते अडचणीत आले. त्यावेळी मी पुढाकार घेऊन त्यांना मदत केली आहे. कोण काय म्हणते यापेक्षा मी ९६ कुळी मराठा आहे.

हेही वाचा : मराठ्यांनी आंदोलन करण्यापेक्षा आमदार, खासदारांना घराबाहेर पडू देऊ नका

साताऱ्यातील त्या मुलांना मीच मदत करत आहे. त्यावेळी त्या मुलांनी भावनिक व रोषातून आंदोलनाचा निर्णय घेतला असेल. पण, त्या तरूणांना मी कुठेही दमबाजी केलेली नाही. मी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांना विनंती केली. एका पक्षाने अशा पध्दतीने निर्णय घेतलेला नाही. ज्यांचे ते समर्थन करतात त्या पक्षांची धोरणे स्पष्ट व्हावीत. देवेंद्र फडणवीस असो किंवा त्यांचे सर्व नेते असतील.

१०२ वी घटना दुरूस्ती त्यांनीच केली, कायदा त्यांनीच केला. पुढे सरकार बदलल्यानंतर ते पुढे नेण्याचे काम आमच्या सरकारने केले. त्यांनी अभ्यास करावा जनतेच्या भावनेशी खेळू नये. त्या मुलांची भावना कळल्यानंतर मी त्यांच्या घरी जाऊन समज दिली. ती कोणत्या राजकिय पक्षाची असले तरी ती मराठी मुले आहेत, हे मलाही माहित आहे. त्यांच्या केसालाही धक्का लागला तर त्यांचे संरक्षण करायला शशीकांत शिंदे समर्थ आहे. मी कोणाच्या आव्हानाला भिक घालत नाही. मी पक्षाशी एकनिष्ट आहे. 

आमदार खासदारांना घराबाहेर पडू देऊ नये, असे वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी आज केले आहे, यावर आमदार शिंदे म्हणाले,
ज्यांची भूमिका स्पष्ट व प्रामाणिक असते, त्यांना कोणाचीच कधीही भिती नसते. ज्यावेळी मराठा समाजाचे आंदोलन सुरू झाले, त्यावेळी कोण पुढे होता, कोण कोणत्या पक्षात होता, आम्ही कोणत्याही पक्षाबरोबर होतो, तरीही आंदोलात सहभागी झालेलो होतो.

मराठा समाजाच्या आंदोलनासाठी मराठा समाजाने बैठक बोलावली होती. त्यामध्ये कोण आमदार, खासदार सहभागी होते याची यादी काढा. त्यावरून कोणाला मराठा समाजाचा कळवळा आहे हे दिसून येईल. मराठा आरक्षण कोणी केले मोदींनी केले की, फडणवीसांनी केले की या सरकारने केले, हा दोषारोप करून राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी आरक्षण कसे मिळवायचे यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. यापुढे ज्या ज्या वेळी मराठा समाजाचे आंदोलन होईल, त्यावेळी शशीकांत शिंदे सर्वात पुढे असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख