नारायण राणे  शनिवारी वसईत; राज्य सरकारवर काय बोलणार याची उत्सुकता....  - Narayan Rane in Vasai on Saturday; Curious about what to say to the state government .... | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

नारायण राणे  शनिवारी वसईत; राज्य सरकारवर काय बोलणार याची उत्सुकता.... 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 18 ऑगस्ट 2021

कोकणानंतर आता वसईमध्येही राणे शासनाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार असे बोलले जात आहे.

विरार : पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी पालघर जिल्ह्याच्या कारभारावर आणि राज्य सरकारवर थेट निशाण साधल्यानंतर आता भाजपचे फायर ब्रँड नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे शनिवारी 'जन आशीर्वाद' यात्रेनिमित्ताने वसईमध्ये येत असल्याने ते राज्य सरकार बाबत काय बोलतात याचे औत्सुक्य लागून राहिले आहे. वसई-विरार पालिका कारभाराविरोधात भाजपने येथे रान उठेवले असतानाच नारायण राणे सर्वच मुद्द्यावर काय बोलतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. Narayan Rane in Vasai on Saturday; Curious about what to say to the state government ....

पंतप्रधानांनी सर्व मंत्र्यांना देशभर फिरून जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी सांगितले आहे. त्यानिमित्ताने दोन दिवसापूर्वी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार पालघर दौऱ्यावर येऊन गेल्यानंतर आता केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे हे शनिवारी (२१ ऑगस्ट)  'जन आशीर्वाद' यात्रा काढणार आहेत.  

हेही वाचा : नगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाजल्या मंदिरातील घंटा

या यात्रेत भाजपाचे जिल्हास्तरीय व स्थानिक पातळीवरील नेतेही सहभागी होणार आहेत. या 'जन आशीर्वाद' यात्रेच्या निमित्ताने केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि   मध्यम उद्योग मंत्री नारायणराव राणे नागरिकांशी संवाद साधण्याबरोबरच विविध योजनांचा आढावा घेणार आहेत. केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांतील लाभार्थींशी संवाद, शेतकऱ्यांबरोबर संवाद, उद्योजकांबरोबर बैठक, दिव्यांग लाभार्थींशी चर्चा, भाजपाचे समर्थ बूथ अभियान आदी कार्यक्रमांमध्येही मंत्री राणे सहभागी होणार आहेत.

आवश्य वाचा : आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली नांदेडात आंदोलन..

या 'जन आशीर्वाद' यात्रेनिमित्ताने राणे शासनावर टीका करतात का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. वसई-विरार पालिका आणि पालघर जिल्ह्यावर राज्य शासन लस देण्यास दुजाभाव करत असल्याचा आरोप यापूर्वीच भाजपने केला आहे. त्याबरोबरच ऑक्सिजनची पळवापळवी, येथील आरोग्याच्या प्रश्नाकडे शासनाने फिरवलेली पाठ, पालिकेतील कामगारांचे प्रश्न, लांबवत चाललेली पालिका निवडणूक आणि प्रशासकाच्या नथीतून येथील कारभार आपल्या हातात ठेवण्याचा शिवसेनेचा चाललेला प्रयत्न, तसेच येथील सत्तारूढ बविआवर टीका करतात का ? या सर्व प्रश्नावर राणे काय बोलतात याची उत्तरे शनिवारी मिळणार असल्याने कोकणानंतर आता वसईमध्येही राणे शासनाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार असे बोलले जात आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख