जयश्री पाटील या अनिल देशमुखांना सर्वोच्च न्यायालयातही अडविणार

सीबीआय चौकशी थांबविण्यासाठी अनिल देशमुखांचे प्रयत्न...
जयश्री पाटील या अनिल देशमुखांना सर्वोच्च न्यायालयातही अडविणार
Anil deshmukh-Jayshree Patil

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्य सरकारची याचिका नामंजूर केल्यानंतर आता या प्रकरणातील मुख्य तक्रारदार अॅड. जयश्री पाटील यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात ‘कॅव्हिएट’ दाखल केले. (Ad Jayshree Patil to move supreme court against Anil Deshmukh)

भ्रष्टाचार आरोपात सीबीआयने देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याविरोधात देशमुख यांनी केलेली याचिका उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. राज्य सरकारनेही यासंबंधी केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली. देशमुख आणि सरकार सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी अपील याचिका करणार आहेत. त्यांनी जर याचिका केली, तर पाटील यांचीही बाजू ऐकून घ्यावी, यासाठी आज पाटील यांनी ‘कॅव्हिएट’ दाखल केले.

गुरुवारी दिलेल्या निकालावर दोन आठवड्यांची स्थगिती देण्याची मागणी राज्य सरकार आणि देशमुख यांच्या वतीने करण्यात आली होती. मात्र न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने ही मागणी अमान्य केली. यामुळे सीबीआय आता या प्रकरणात तपास करू शकेल. माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्रात देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. या पत्रावरून पाटील यांनी मलबार हिल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा प्राथमिक तपास करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने एप्रिलमध्ये दिले होते.

उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला आहे. सीबीआयच्या एफआयआरविरोधात केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयातने आज फेटाळून लावली. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

मात्र सीबीआयच्या याच एफआरआरमधील काही परिच्छेद वगळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दाखल केलेली याचिकाही खंपपीठाने फेटाळली. सीबीआयने पोलिस बदल्यांच्या चौकशीबद्दलचा उल्लेख या एफआयआरमध्ये केला आहे. हा उल्लेख म्हणजे सरकार उलथविण्याचा कट असल्याचे राज्य सरकारचे म्हणणे होते. मात्र बदल्यांमधील गैरप्रकारांची चौकशी आवश्यक असल्याचे मत सीबीआयने व्यक्त केले होते.

न्यायालयाने दोन्ही याचिका फेटाळल्याने देशमुख यांची चौकशी करण्याचा सीबीआयचा मार्ग खुला झाला आहे. देशमुख यांची अंमलबजावणी संचालनालयानेही चौकशी सुरू केली आहे. अद्याप देशमुख ईडीसमोर किंवा सीबीआयसमोर जबाबाला हजर झालेल नाहीत. आजच्या निकालानंतर देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा मार्ग खुला आहे. तेथेच आता पाटील याही त्यांच्याविरोधात उतरणार आहेत.  

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in