चकमकफेम पोलिस निरीक्षक दया नायक यांना गोंदिया दाखवले... - encounter specialist Police inspector Daya Nayak transfer to Gondia District | Politics Marathi News - Sarkarnama

चकमकफेम पोलिस निरीक्षक दया नायक यांना गोंदिया दाखवले...

सूरज सावंत
गुरुवार, 6 मे 2021

रुजू होणार का, याची उत्सुकता 

मुंबई : चकमकफे पोलिस अधिकारी  दया नायक यांची दहशतवादी विरोधी पथकातून (ATS, Daya Nayak) बदली करण्यात आली असून त्यांना थेट गोंदिया जिल्ह्यात पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. प्रशासकीय कारणास्तव ही बदली केली गेली असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. (PI Daya Nayak transfers to Gondia). पोलिस दलात साफसफाई मोहीम तर सुरू झाली नाही ना, याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. 

दया यांनी मनसुख हिरेन प्रकरणात महाराष्ट्र एटीएसकडून तपास करत वादग्रस्त पोलिस अधिकार सचिन वाझे आणि त्याच्यासह आरोपींचा पर्दाफाश करण्यात मोठी कामगिरी बजावली होती. (Sachin Waze) मात्र  हे प्रकरण एनआयएकडे (NIA investigating Mansukh Hiren Murder case) एटीसएसचा तपास थांबला होता. 

दया नायक मुंबईच्या पोलिस वर्तुळातील नेहमीच चर्चेत असणारे नाव आहे. मुंबई पोलिस दलात 1995 मध्ये दाखल झालेल्या नायक यांनी अनेक गुंडांना चकमकीत ठार मारले. त्यांच्यावर मुंबईतील अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचेही आरोप झाले होते. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही कारवाई केली होती. दया नायक यांनी त्यांच्या कर्नाटकातील मूळ गावी शाळा सुरू केली असून त्या शाळेचे उदघाटन बिग बी अमिताभ बच्चन यांनी केले होते. या वेळी एम. एफ. हुसेन, सुनील शेट्टी, अफताब शिवदासानी असे सेलिब्रिटी उपस्थित होते. लालचुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईनंतर नायक यांना तुरुंगात जावे लागले होते. तसेच त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अपसंपदा कमवण्याचा आरोप झाला होता.

साऱ्या प्रकरणांचा न्यायालयीन निपटारा झाल्यानंतर त्यांना पुन्हा 16 जून 2012 रोजी पुन्हा सेवेत घेण्यात आले. त्यानंतर त्यांची बदली जानेवारी 2014 मध्ये नागपूर येथे करण्यात आली. पण ते तेथे रूजू झाले नाहीत. त्यामुळे त्यांना जुलै 2015 मध्ये पुन्हा निलंबित करण्यात आले. त्यानंतर त्यांची नागपूरची बदली रद्द करण्यात आली.  त्यांना पुन्हा मुंबई पोलिस दलात 11 जानेवारी 2016 मध्ये रुजू करून घेण्यात आले. त्यानंतर त्यांना एटीएसमध्ये नियुक्ती देण्यात आली होती. नागपूरला न गेलेले नायक हे आता गोंदियात जाणार का, याची उत्सुकता आहे.

वाचा ही बातमी : अनिल देशमुखांवर कारवाई करण्यास सीबीआयला मोकळीक

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख