मुंबई पालिका आय़ुक्त इक्बाल चहल यांच्या आय़ुष्यातील ती `काळरात्र` - BMCC commissioner Iqbal Chahal still remembers that painful night | Politics Marathi News - Sarkarnama

मुंबई पालिका आय़ुक्त इक्बाल चहल यांच्या आय़ुष्यातील ती `काळरात्र`

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 9 मे 2021

मुंबई पालिकेच्या कामाची सर्वोच्च न्यायालयाकडूनही दखल... 

मुंबई : कोव्हिडची पहिली लाट भरात असताना ८ मे २०२० रोजी महानगरपालिका आयुक्तपदी इक्बालसिंह चहल यांची नियुक्ती करण्यात आली. त्याला आज वर्ष पूर्ण होत आहे. (Iqbal Chahal completes one year as BMCC commissioner) या काळात चहल यांच्यावर अनेक राजकीय आरोप झाले; पण ते मागे हटले नाहीत. तातडीने निर्णय आणि तितक्याच वेगाने कृती हे सूत्र त्यांनी अवलंबले. त्यामुळेच आज मुंबईतील रुग्णसंख्या आटोक्यात असल्याचे आशादायी चित्र पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि इतर राज्यांना कोरोनाविरोधातील लढा यशस्वी करायचा असेल तर मुंबईकडून शिका, असे निर्देश दिले होते. (Supreme court pats BMCC work in covid)

गेल्या वर्षभरात चहल यांच्या कामाचा झपाटा मोठा आहे. त्याची चुणूक चहल यांनी नियुक्ती झालेल्या पहिल्या दिवसाच्या सायंकाळीच दाखवली. त्यांनी सर्व अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेतली. दुसऱ्या दिवशी ते तडक प्रमुख रुग्णालयांच्या पाहणीसाठी पोहोचले. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात जाऊन त्यांनी कोरोनाग्रस्तांची विचारपूस केली. धारावीत जाऊन तेथील स्थितीचा  आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी तातडीने निर्णय घेण्यास सुरुवात केली.

जम्बो कोव्हिड केंद्र उभारण्यापासून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय या काळात झाले. त्यावर अनेकांकडून आरोपही करण्यात आले. धारावी मॉडेलपासून झालेली सुरुवात आज ‘मुंबई मॉडेल’ म्हणून देशात नावाजले जात आहे. सर्वोच्च न्यायालयानेही याची दखल घेऊन आयुक्त चहल यांच्या नावाचा उल्लेखही केला. मात्र, हे यश सर्वांचे आहे, अशा शब्दांत चहल कृतज्ञता व्यक्त करतात.

धारावी सूत्र

धारावीत पालिकेने घराघरांत जाऊन शोधमोहीम राबवली. त्यामुळे वेळीच बाधित शोधून त्यांच्यावर तत्काळ उपचार करण्यात आले. तसेच, नजीकच्या संपर्कातील व्यक्तींचे विलगीकरण करून संसर्गाचा धोकाही कमी करण्यात आला.

‘ती रात्र आयुष्यातील सर्वात कठीण’

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी वांद्रे-कुर्ला संकुलात जम्बो कोव्हिड केंद्र उभारण्यात आले. तेथे महाकाय टाक्या बांधून प्राणवायूची साठवण करण्यात आली. दुसऱ्या लाटेत प्राणवायूची गरज ओळखून नियोजनासाठी पथकाची स्थापना करण्यात आली. रुग्णालयातील प्राणवायू संपण्याच्या स्थितीत असताना १६० हून अधिक रुग्णांना रात्री तातडीची मोहीम राबवून सुरक्षित केंद्रांमध्ये हलविण्यात आले. ती रात्र आयुष्यातील सर्वात कठीण होती, असे आयुक्त नमूद करतात. पुढील आठवड्याची गरज ओळखून खाटा वाढविण्याबरोबरच त्याचे नियोजन करण्यास प्राधान्य दिले. ही जबाबदारी नियंत्रण कक्षावर सोपविण्यात आली. कोरोनाग्रस्तांची नोंदणी झाल्यास नियंत्रण कक्षातून खाटांचे नियोजन केले जात होते.

ही बातमी पण वाचा : राज्यातील लाॅकडाऊन वाढणार का, राजेश टोपे काय म्हणाले?

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख